मुंबई - मुंबई महापालिकेका नागरिकांच्या आरोग्याची काळजी सातत्याने घेत असते. याच अनुषंगाने महापालिका क्षेत्रात विविध लसीकरण मोहिमांचे आयोजन नियमितपणे करण्यात येते. येत्या रविवार १८ सप्टेंबर पासून मुंबईत पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. शुक्रवार २३ सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणा-या मोहिमेदरम्यान ५ वर्षे वयाखालील अंदाजे ८ लाख ९० हजार ४२५ बालकांना लस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ५ हजार टीम दिवसा कार्यरत राहणार आहेत. स्थलांतरित बेघर बालकांच्या लसीकरणाकरीता २४ रात्र टीम कार्यरत राहणार आहेत. तरी मुंबईकर नागरिकांनी व विशेष करुन ५ वर्षे वयाखालील बालकांच्या पालकांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.
मुंबईत आतापर्यंत १३४ पल्स पोलिओ लसीकरण मोहिमा - ५ वर्षे वयाखालील सर्व बालकांना एकाच दिवसात नियमित लसीकरण व्यतिरिक्त ‘पोलिओचा अतिरिक्त’ डोस पाजणे अशी ही मोहीम आहे. केंद्र व राज्यशासनाच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार सन १९९५ पासून विशिष्ट महिन्यातील रविवारी आणि त्यापुढील पाच दिवस घरोघरी जाऊन पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात येत आहे. आपल्या देशात ही मोहीम यशस्वीपणे राबविल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारताला २०१४ पासून पोलिओमुक्त देश म्हणून घोषित केले आहे. परंतु, सन २०२२ मध्ये जगभरातील काही देशांमध्ये १९ पोलिओ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये आपल्या देशाशेजारील देश असणा-या पाकिस्तानमध्ये १४, तर अफगाणिस्तानमध्ये १ रुग्ण आढळून आला आहे. तसेच मोझांबिक या देशात ४ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे पोलिओमुक्त झालेल्या देशांनी देखील योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी महानगरपालिका कार्यक्षेत्रात आतापर्यंत १३४ पल्स पोलिओ लसीकरण मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. याच धर्तीवर येत्या रविवारपासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत येत्या रविवारी लसीकरण बूथवर पाच वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओचे दोन थेंब पाजण्यात येतील. तसेच त्यानंतर पुढील पाच दिवस पल्स पोलिओच्या दिवशी ज्या बालकांना डोस पाजायचा राहून गेला असेल, त्यांना घरोघरी भेटी देऊन प्रत्येकी २ स्वयंसेवकांच्या लसीकरणद्वारे पोलिओ डोस पाजण्यात येणार आहे असे डॉ. गोमारे यांनी सांगतले.
अशी राबवणार मोहीम - १८ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२२ दरम्यान अंदाजे ८ लाख ९० हजार ४२५ बालकांना या मोहिमेअंतर्गत पोलिओ डोस पाजण्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील आरोग्य केंद्रामार्फत १८ सप्टेंबर या रविवारी एकूण ४ हजार ८२१ बूथ कार्यरत राहणार आहेत. तसेच या दिवशी ३२२ ट्रान्झिट टीम विविध रेल्वे स्थानके, उदयाने, विविध पर्यटन स्थळे या ठिकाणी सकाळी ८ ते संध्याकाळी ५ पर्यंत कार्यरत असतील. विविध बांधकाम स्थळांवरील स्थलांतरित बालकांचे लसीकरण करण्यासाठी ४३ टीम दिवसा कार्यरत असतील. १९ सप्टेंबर ते २३ सप्टेंबर २०२२ या पाच दिवसात पल्स पोलिओ लसीकरण करण्याकरीता घरभेटींसाठी आरोग्य केंद्रामार्फत ४० लाख घरांना भेटी देण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे ५ हजार टीम कार्यरत राहणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभाग कार्यालयातंर्गत २३ सप्टेंबर रोजी रस्त्यावर राहणा-या स्थलांतरीत बेघर बालकांच्या लसीकरणाकरीता २४ रात्र टीम कार्यरत असणार आहेत. या अनुषंगाने सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपल्या ५ वर्षाखालील बालकांना १८ सप्टेंबर रोजी आपल्या जवळील पल्स पोलिओ लसीकरण बूथवर नेऊन पोलिओचा अतिरिक्त डोस पाजून घ्यावा. तसेच पुढील पाच दिवस १९ ते २३ सप्टेंबर पर्यंत घरभेटीस येणा-या आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांना सहकार्य करावे, अशीही विनंती डॉ. गोमारे यांनी केली आहे.