मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला महिना उलटला आहे. या महिनाभरात अनेकजण बेरोजगार असल्याने त्यांची उपासमार होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
दिल्ली सरकारने रिक्षा व टॅक्सी चालकांनादेखील महिना पाच हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता घोषित केला आहे. महाराष्ट्रात १० लाख ६० हजार रिक्षाचालक तसेच २ लाख ७५ हजार टॅक्सीचालक परवानाधारक आहेत.
राज्य सरकारने नोंदणीकृत बांधकाम मजुरांना २ हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसारच मोटार वाहन विभागाकडून माहिती घेवून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांना मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
दिवसाला १.९० डॉलर अर्थात भारतीय १४४ रुपयांपेक्षा कमी कमाई असलेल्यांचा जगतिक बँकेने दारिद्रय रेषेखाली समावेश केला आहे. या सूत्रानुसार सध्याच्या काळात रिक्षा आणि टॅक्सी चालकांची कमाई काहीही नाही. त्यामुळे राज्य सरकारने गांभीर्याने विचार करून पावले उचलावीत असेही चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा-कोरोनामुळे जगभरात मृतांचा आकडा 2 लाखांच्या जवळ; 28 लाखांपेक्षा जास्त बाधित
दरम्यान, १५ मार्चला घोषित केलेली टाळेबंदी ३ मे रोजी संपणार आहे. मात्र, टाळेबंदी वाढणार संपल्याबाबत अनिश्चितता आहे. टाळेबंदीदरम्यान सर्व उद्योग व व्यवसाय ठप्प झाल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान झाले आहे.
हेही वाचा-दीडशे वर्षांच्या काळात प्रथमच जळगावातील सराफा बाजार अक्षय्यतृतीयेला राहणार बंद!