मुंबई- राज्यात अनुदानावर आलेल्या शाळांना अनुदान वितरीत करण्यासाठी राज्य सरकारकडून 304 कोटी रुपयांची तरतूद केली जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तरतुदीनुसार राज्यातील सर्व अनुदानाचे वितरण विहित निकषाच्या कार्यपद्धतीत केले जाणार आहे. यामुळे राज्यात असलेल्या 4 हजार 623 शाळा, आठ हजार 857 तुकड्या आणि या शाळांवर असलेल्या 43 हजार 112 शिक्षक आणि शिक्षकेतर यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
मंगळवारी विधान भवन परिसरात शिक्षक आमदारांनी आंदोलन करून सरकारची कोंडी केली होती. त्यामुळे आज याविषयीचा तातडीचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणून त्याविषयी निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात शिक्षक आमदारांनी समाधान व्यक्त केले असून अनुदानासाठी जाहीर करण्यात आलेला निधी सरकारकडून वितरित करण्यासाठीचे सर्व तपासून तो शाळांना देण्यात येणार आहे.
हेही वाचा -कोहिनूर मिल प्रकरण; चौकशीसाठी राजन शिरोडकर ईडी कार्यालयात दाखल
या पूर्वी 20 टक्के अनुदानावर आलेल्या आणि मूल्यांकनात पात्र ठरलेल्या सर्व शाळांना आणि त्यात त्यावरील तुकड्यांना हे अनुदान दिले जाणार आहे. त्यासोबतच नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांनाही अनुदान दिले जाणार असून त्यासाठीची माहिती अशिष शेलार यांनी यावेळी दिली.