मुंबई - उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरी येथे भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज 'महाराष्ट्र बंद' ची हाक दिली आहे. आज हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे आणि मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मोदी आणि योगी सरकारचा जोरदार निषेध करण्यात आला.
हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शने -
सकाळी साडेदहा वाजता हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्यावर मोदी व योगी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. लखीमपूर हिंसाचाराचा निषेध आणि शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी काळ्या फिती बांधत केंद्र व योगी सरकारचा जोरदार निषेध केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, मुंबई अध्यक्ष व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. विनाकारण कोणालाही त्रास होऊ नये, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. हिंसेचे समर्थन होणार नाही.शांततापूर्वक पद्धतीने हे आंदोलन पुढे घेऊन जायचे आहे, असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले. 'महाराष्ट्र बंद' मध्ये कुठे अनुचित प्रकार घडला असेल, तर त्याची माहिती घेतली जाईल. या बंदला राज्यातील जनतेने चांगला पाठिंबा दिला आहे. शिवाय राज्यातील व्यापारी व कामगार संघटनांनी पाठिंबा दिल्याने सांघिक बंद यशस्वी झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.