मुंबई - कृषी कायदा रद्द व्हावा यासाठी आज शेतकऱ्यांनी भारत बंदची हाक दिली होती. मुंबईत मात्र या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी जोरदार आंदोलन देखील करण्यात आले आहे. नवी मुंबईतील शीख बांधवांनी नवी मुंबई ते नरिमन पॉईंट असे पायी आंदोलनाचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना वाशी जकात नाका येथे अडवले. काही वेळ तिथे गोंधळ झाला होता. मात्र, पोलिसांनी सामंजस्याने त्यांना समजावून परत पाठवले.
कृषी कायद्याविरोधात भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यासाठी विरोधी पक्षांनी मोठी तयारी केलेली पाहायला मिळत आहे. नवी मुंबईतून काही शीख बांधव नरिमन पॉईंट या ठिकाणी जाऊन निदर्शने करणार होती. परंतु त्यांना मुंबईच्या वेशीवर जकात नाका येथे पोलिसांनी अडवले. त्यामुळे शीख बांधवांनी याच ठिकाणी रास्ता रोको करायला सुरुवात केली होती. मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प केली होती. तर यात काही जणांनी आपले डंपर रस्त्यात आडवे करून मुंबईकडे जाणारा रस्ता पूर्णतः रोखला होता. मात्र, काही वेळानंतर पोलिसांनी त्यांना समजावून परत पाठवले.