मुंबई - मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण सुरू आहे. लसीचा तुटवडा असल्याने लसीकरणात अडचणी येत असल्याने पालिकेने ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ८ पुरवठादारांनी प्रस्ताव सादर केला आहे. त्यामधील तीन कंपन्या आरोग्याशी संबंधित आहेत. तर इतर कंपन्या या खाद्य पदार्थ, कपडे पुरवठादार, कन्सलटंट तसेच मिडिया आणि फिल्म बनवणाऱ्या कंपन्या आहेत. तसेच रोमानिया येथील कंपनीने फायझरची लस मुंबई महापालिकेला देण्याचे मान्य केले होते. मात्र फायझर कंपनीने आपला कोणाताही डिस्ट्रिब्युटर नसल्याचे जाहीर केल्याने त्या कंपनीने आपला प्रस्ताव मागे घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेला लस मिळवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
ग्लोबल टेंडरबाबत प्रस्ताव -
मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने लसीचा पुरवठा योग्य प्रमाणात व्हावा आणि नागरिकांना लस देता यावी यासाठी ग्लोबल टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अनुक्रमे 5 कोटी आणि 1 कोटी लसींसाठी ग्लोबल एक्स्प्रेशन्स ऑफ इंटरेस्टला प्रतिसाद दिला आहे. त्यात भारतातील गेमचेंजर; तापडिया आंतरराष्ट्रीय इंटरव्हेंशनल टेक्नॉलॉजी अँड हेल्थकेअर लिमिटेड; आणि गेटआयट इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. तसेच भारतबाहेरील प्रोक्चरनेट, किन्फोक ट्रेडिंग एफझेडसी, ग्रूपो फेर्मेक्सोर, स्वित्झर्लंडची मेडिकल सप्लाय कंपनी (एमएससीएस) आणि हॅडली डेव्हलपमेंट एलएलसी यांनीही प्रतिसाद दिला आहे. ग्लोबल टेंडरमध्ये भाग घेऊ इच्छिणाऱ्या तीन कंपन्या आरोग्याशी संलग्न आहेत. त्यांनी एका डोससाठी 10-38 डॉलर म्हणजेच 728 ते 2767 रुपये दर लावला आहे. “काहींनी आगाऊ ऑर्डर दिल्यावर तीन आठवड्यांच्या आत पुरवठा करण्याचेही आश्वासन दिले आहे. महाराष्ट्राप्रमाणेच अनेक राज्यांनी जागतिक निविदांची नोंद केली आणि त्याच वेळी जागतिक बाजारात स्पर्धा करण्याऐवजी केंद्राने लस घ्यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.
भारतातील 'या' तीन कंपन्यांचा सहभाग -
गेमचेंजर ही एक मॅनेजमेंट कन्सल्टन्सी फर्म आहे जी ऑटोमोबाईल, फॅशन, फूड आणि टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये काम करते. त्यांनी आपण स्पुटनिकचे वितरक असल्याचे म्हटले आहे. पुणे स्थित तापडिया इंटरनॅशनल ही घाऊक आणि कमिशनवर काम करणारी कंपनी आहे. औषध व वैद्यकीय उपकरणे व्यवहार करणाऱ्या या कंपनीने २०२० मध्ये ६.१ कोटी रुपयांचा महसूल आणि १.९९ कोटी रुपयांचा तोटा असल्याचे कळवले आहे. तसेच गेटआयटी इनोव्हेशन्स ही दिल्लीस्थित कंपनी आहे. जी मीडिया, फिल्म मेकिंग आणि कम्युनिकेशन्समध्ये काम करते. संजीव नरुला आणि रचना नरुला हे त्याचे प्रवर्तक आहेत. २०१२ पासून त्यांच्या कंपनीला कोणताही महसूल मिळालेला नाही असे दाखवण्यात आले आहे.
पालिकेकडून पडताळणी सुरू -
मुंबई महापालिकेकडे ज्या कंपन्यांनी ग्लोबल टेंडरसाठी प्रस्ताव पाठवले आहेत. त्यापैकी बहुतेक कंपन्या या आरोग्य क्षेत्रातील नाहीत. तर तीन कंपन्या या आरोग्य क्षेत्रातील आहेत. मात्र या कंपन्यांचा वार्षिक अहवाल पाहता आणि त्यांचे काम पाहता त्यांना लस पुरवठा करण्याचे काम देणे धोकादायक ठरू शकते. यासाठी पालिकेचे वरिष्ठ अधिकारी या कंपन्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर बोलत आहेत. हे पुरवठादार खरोखर १ कोटी लस पुरवू शकतात का याची चाचपणी करत आहेत. तसेच रशिया सरकारला पालिकेने पात्र पाठवले आहे. या पत्रात स्फुटनिक लसीचे नक्की कोण पुवठादार भारतात नियुक्त केला आहे त्याचे नाव आणि तपशील मागवण्यात आलेला आहे. यामुळे ऑर्डर दिल्यावर वेल्वार लसीचा पुरवठा होईल याची खात्री केली जात आहे. तसेच मुंबईच्या सिस्टर कर्सन असलेल्या सेंट पिटर्सबर्ग, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, बुसान, स्टूटगार्ड आणि योकोहोमा या ६ शहरांच्या महापौरांना पत्र लिहून लसीचा पुरवठा करावा असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात आले आहे अशी माहिती पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत काल 43 हजार 181 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 41 हजार 192 लाभार्थ्यांना पहिला, तर 1 हजार 989 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 31 लाख 33 हजार 311 लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 23 लाख 88 हजार 349 लाभार्थ्यांना पहिला तर 7 लाख 44 हजार 962 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत 3 लाख 2 हजार 337 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 60 हजार 425 फ्रंटलाईन वर्कर, 12 लाख 6 हजार 311 जेष्ठ नागरिक, 11 लाख 13 हजार 059 45 ते 59 वर्षामधील नागरिकांना आणि 18 ते 44 वर्षामधील 1 लाख 50 हजार 642 नागरिकांना लस देण्यात आली. तसेच, 537 स्तनदा मातांनाही लसीचे डोस देण्यात आले आहेत.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी | 3,02,337 |
फ्रंटलाईन वर्कर | 3,60,425 |
जेष्ठ नागरिक | 12,06,311 |
45 ते 59 वयोगट | 11,13,059 |
18 तर 44 वयोगट | 1,50,642 |
स्तनदा माता | 537 |
एकूण लसीकरण | 31,33,311 |
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करना लस दिली गेली. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली गेली. 1 मे पासून 18 ते 45 वर्षामधील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरु झाले आहे.
विविध गटानुसार लसीकरण -
मुुंबईत सोमवार ते बुधवार जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांग यांचे लसीकरण केले जात आहे. तर गुरुवार ते शनिवार या काळात कोविन अॅपवर नोंदणी करून मोबाईलवर संदेश आलेल्यांनी लसीकरणाला यावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.