मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत (Pravin Raut ED Custody) यांना आज पहाटे ईडीने अटक केली (ED Arrested Pravin Raut) होती. प्रवीण राऊत यांना पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. प्रवीण राऊत यांना मुंबईतील सत्र न्यायालयातील PMLA न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांना 9 फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी दिली आहे.
- ED ने आज प्रवीण राऊत यांना केली होती अटक -
पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत यांची 72 कोटी रुपये किमतीची मालमत्ता जप्त केली होती. पीएमसी बँकेतील 4 हजार 300 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणी ईडी तपास करत आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने प्रवीण राऊत यांना फेब्रुवारी 2021 मध्ये अटक केली होती. पीएमसी बँकेचे 90 कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या अकाऊंटवरून संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या अकाऊंटवर 55 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते. हा व्यवहार का करण्यात आला होता याचं उत्तर ईडीला हवं आहे. याचसाठी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं होतं.
- कोण आहेत प्रवीण राऊत?
प्रवीण राऊत हे खासदार संजय राऊत यांचे कौटुंबिक मित्र मानले जातात. तर एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्याशी संबंधित असलेले वाधवान कुटुंबियांशीसुद्धा त्यांची जवळीक आहे. प्रवीण राऊत यांनी पीएमसी बँक घोटाळ्याचे 90 कोटी रुपये हडपले, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांची कंपनी गुरुआशिष कन्स्ट्रक्शन लिमिटेड यांचा व्यवहार एचडीआयएलसोबत होता. या व्यवहारमुळेच प्रवीण राऊत यांची एचडीआयएल कंपनीशी संबंध वाढले. प्रवीण राऊत यांचा एचडीआयएल आणि पीएमसी बँक घोटाळ्यात सहभाग असल्याची खात्री ईडीला आहे.