मुंबई - कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला पीपीई किट न घालता किंवा कोविड प्रोटोकॉल न पाळता आमदार रोहित पवार यांनी भेट दिली आणि डान्सही केला. यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी यावर जोरदार आक्षेप घेतला असून, शरद पवार यांचे नातू आहेत, म्हणून रोहित पवारांना दुसरा न्याय का? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - अमरावतीत एकाच कुटुंबातील २ सख्ख्या भावांसह तिघांचा कोरोनाने मृत्यू
रोहित पवार यांना पाठीशी घातलं जातंय का?
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी नुकतीच कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी रुग्णांसोबत झिंगाट गाण्यावर डान्स केला आहे. या संदर्भात बोलताना दरेकर म्हणाले की, रोहित पवार यांनी एका कोविड सेंटरवर जाऊन कोविड प्रोटोकॉलचा भंग केला, हे निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी ते पीपीई किट न घालता गेले, रुग्णांमध्ये मिसळले, डान्स केला. त्यामुळे ते 'सुपर स्प्रेडर' ठरू शकतात.
शरद पवारांचे नातू म्हणून दुसरा न्याय?
सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि रोहित पवार हे शरद पवार यांचे नातू आहेत म्हणून त्यांना वेगळा न्याय दिला जाऊ शकतो का? कुणीही लोकप्रतिनिधी असो किंवा मोठा नेता, त्यांनी कोरोना नियमांचे गांभीर्य आणि भान ठेवलंच पाहिजे, अशी अपेक्षा आहे. पण पवारांचे नातू असल्या कारणाने त्यांच्यावर सरकार काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं आहे, असे दरेकर म्हणाले.
हेही वाचा - धक्कादायक! गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना मृतदेहांची अदलाबदल