मुंबई - काही दशकांपूर्वी बीआर चोप्रा फिल्म्स ने छोट्या पडद्यावर प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली होती आणि चित्रपटसृष्टीत टेलिव्हिजन वर काम करणे त्याकाळी थोडे हलके समजले जायचे. परंतु रामानंद सागर यांनी केलेल्या छोट्या पडद्यावरील ‘रामायण’ या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळविली आणि त्यामुळेच कदाचित बी आर फिल्म्स ‘महाभारत’ छोट्या पडद्यावर घेऊन आले. मनोरंजनसृष्टीतील अनेक गाजलेली नाव याचा भाग झाली आणि अनेक नवी नावं गाजली. अर्जुन (खरं नावं - फिरोझ खान), नितीश भारद्वाज, पंकज धीर, मुकेश खन्ना, पुनीत इस्सर (ज्याच्या ‘कुली’ चित्रपटाच्या शुटिंगवेळीच्या ‘फाईट’ मुळे अमिताभ जखमी झाला होता), गजेंद्र चौहान, सुरेंद्र पाल, रूपाली गांगुली (द्रौपदीच्या भूमिकेसाठी आधी जुही चावला चे नाव जवळपास निश्चित झाले होते) आणि प्रवीण कुमार सोबती यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
प्रवीण कुमार सोबती यांनी भीम हे पात्र रंगविले होते आणि त्या भूमिकेलाही, महाभारतातील इतर भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. प्रवीण कुमार सव्वासहा फूट उंच होते आणि भरदार शरीराचे मालिक होते. ते शारीरिकदृष्ट्या भीमाच्या भूमिकेत चपखलपणे बसले होते आणि रवी चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनयही चांगला करीत होते. १९८८ सुरु झालेली ‘महाभारत’ ही मालिका १९९० पर्यन्त सुरु होती आणि त्यादरम्यान या मालिकेत काम करणारे सर्वच फेमस झाले होते. सर्वचजण भारतीयांच्या घराघरात पोहोचले. प्रवीण कुमार यांना फेमस होण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्यागत वाटत होते. कारण ते मुंबई आले होते ते अभिनय करण्यासाठीच.
ऑलम्पिकसाठी दोनदा प्रतिनिधित्व -
प्रवीण कुमार सोबती ग्वालियर मध्ये बीएसएफ मध्ये नोकरी करीत होते. परंतु शरीरयष्टी सुदृढ असल्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीचे आकर्षण होते. त्यांनी आपला पहिला चित्रपट निव्वळ १०० रुपयांचा ‘शगुन’ घेत साईन केला होता. त्यानंतर त्यांनी साकारलेल्या महाभारतातील भीमाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. महत्वाचे म्हणजे मनोरंजनसृष्टीतील प्रवेशाआधी प्रवीण कुमार यांचे नावं झालेले होते. ते एक उत्तम ऍथलिट होते आणि त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांत हॅमर व डिस्कस थ्रो मध्ये अनेक पारितोषिकं पटकावली होती. आशियाई आणि कॉमनवेल्थ गेम्स मध्ये त्यांनी पदकांची लयलूट केलेली होती. हॉंगकॉंग येथे भरलेल्या आशियाई गेम्स मध्ये तर त्यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. ऑलम्पिक साठी त्यांनी दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु स्पोर्ट्स आणि मनोरंजनक्षेत्रात देशाचे नावं मोठे करणाऱ्या ‘पंजाब दा पुत्तर’ प्रवीण कुमार सोबती यांनी आज इहलोक सोडला. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ईटीव्ही भारत मराठी तर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली!