मुंबई : एक आंतरराष्ट्रीय शहर अशी मुंबईची ओळख आहे. या मुंबईत तुम्हाला एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या व्यक्तीपासून अगदी जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादीत असणारे उद्योगपती देखील पाहायला मिळतील. अशा या वेगवान शहरात अनेक जण आपले स्वप्न घेऊन येतात. काही जणांची पूर्ण होतात तर काहीजणांची अपूर्ण राहतात. यात अनेकांना कष्ट हे करावेच लागतात स्ट्रगल हा कोणाच्याही वाट्याला चुकलेला नाही. मात्र, याच मुंबईत कुर्ल्यातील मुस्लिम नागरिकांना जगण्याच्या संघर्षाबरोबरच अखेरच्या प्रवासाचा देखील संघर्ष करावा लागतोय. कारण, कुर्ला पश्चिम भागात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचे पार्थिव कुर्ला पूर्वेला असलेल्या कब्रस्तानात ( Graveyard at Kurla East ) नेण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे इथल्या लोकांना आपल्या परिवारातील सदस्याचे पार्थिव थेट प्लॅटफॉर्मवरूनच न्यावे लागते.
प्लॅटफॉर्म वरील पब्लिक ब्रिज अंत्ययात्रेसाठी सोयीस्कर : अंत्ययात्रेत साधारण शंभरते दीडशे लोक उपस्थित असतात. ही अंत्ययात्रा फलाटावरील पदाचारी पूल चढून न्यावी लागत असल्याने खांदेकऱ्यांना ते पार्थिव तिरकं करावं लागतं व आडव्या अवस्थेत मृतदेह उचलून द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा हा मृतदेह त्या जनाजावरून खाली पडण्याची देखील भीती असते. त्यामुळे जर एखाद्या वेळी हा मृतदेह जनजावरून खाली पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता असते.
मागील अनेक वर्षांपासून अशीच निघते जानाजा : या संदर्भात आम्ही मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर लढणारे सामाजिक कार्यकर्ते शेख वाजीद पानसरे यांच्याशी संपर्क केला असता ते सांगतात की, प्लॅटफॉर्म वरून प्रेतयात्रा जाणं हे इथल्या लोकांसाठी नवीन नाही. मागच्या अनेक वर्षांपासून प्लॅटफॉर्मवरून प्रेतयात्रा निघते. कुर्ला पूर्वेला असलेल्या कुरेशी नगर मधील कब्रस्तानात जाण्यासाठी कुर्ला पश्चिमेतील नागरिकांना रेल्वे प्लॅटफॉर्म वरील प्रवासी पुलाचा वापर करावा लागतो. इथं मुस्लिम समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे या कुस्तीच्या लोकसंख्येप्रमाणे विचार केल्यास त्या प्रमाणात इथं कबरस्तान नाही एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या वस्तीत इथं एकच कब्रस्तान आहे.
सुन्नी समाजासाठी जवळ असलेल एकमेव कब्रस्तान : शेख वाजीद सांगतात की, कुर्ला ईस्ट आणि कुर्ला वेस्ट अशा दोन्हीकडच्या लोकांना जवळ असलेल ते एकमेव कबरस्थान आहे. सुन्नी समाजासाठी जरीमरी आणि आणखी एक कब्रस्तान आहे अशी एकूण तीन कब्रस्तान आहेत. मात्र ते अंतर खूप लांब पडतं. त्या मनाने हे कब्रस्तान आम्हाला खूप जवळ आहे. पण, तिकडे जायला सोयीस्कर असा रस्ता नाही.
कब्रस्तानात जायला रस्ताच नाही : या एकमेव असलेल्या कबरस्थानात जाण्यासाठी कोणताही रस्ताच नाही. मागील अनेक वर्ष मुस्लिम समाजाच्या वतीने प्रशासन असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील यांच्याकडे आम्ही रस्त्याबाबत पाठपुरावा करतोय. मात्र, सर्वजण होकारात्मक माना डोलवतात पण त्याचे पुढे काहीच होत नाही. त्यामुळे या प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे समाजाला अद्याप देखील मरण यातना सोसाव्या लागत आहेत. असं वाजीद सांगतात.
तरुण मुलं करतात स्वयंसेवकाचं काम : वाजिद पुढे सांगतात की, या प्लॅटफॉर्मवरून प्रेत घेऊन जाणे हे आमच्या समोरचं खूप मोठं टास्क असतं. कारण, प्रेत नेत असतानाच जर एखादी ट्रेन आली तर मोठी पंचायत होते. ट्रेनची गर्दी व त्या प्रेतासोबत आलेली गर्दी अनेक वेळा वाद होतो. त्यामुळे अशावेळी आमचे काही तरुण मुलं तिथे स्वयंसेवकाचे काम करत असतात. ज्यावेळी ट्रेन येते तेव्हा ही मुलं येणाऱ्या आणि जाणाऱ्या गर्दीसाठी वाट काढून देण्याचं काम करतात. त्यामुळे आतापर्यंत कोणतीही हानी अथवा मोठे वाद झालेले नाहीत पण हे कुठेतरी थांबलं पाहिजे.
ब्रिज शिवाय पर्याय नाही: कुरेशी नगर येथील कब्रस्तानात जाण्यासाठी ब्रिजशिवाय पर्याय नाही. कारण, तो परिसर पूर्ण रेल्वे मार्गांनी वेढलेला आहे. तिथल्या एका बाजूने मध्य रेल्वेची लाईन जाते दुसऱ्या वाजून हार्बर रेल्वेची लाईन जाते तर तिसऱ्या बाजून मालगाडीची लाईन जाते. त्यामुळे त्यामुळे तिथून काही मार्ग बनवण्याला पर्याय नाही त्यामुळे तिथे ब्रिज बनवावा लागणार आहे.
रेल्वेचा सकारात्मक प्रतिसाद पण BMC ढिम्म : हा मार्ग रेल्वेच्या जागेतून जाणार असल्यामुळे त्याला मध्य रेल्वेचू परवानगी गरजेची होती. याबाबतीत मध्य रेल्वेचा इथल्या सामाजिक कार्यकर्त्यांना यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. पण, फक्त रेल्वेच नाही तर यात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पूल बांधणी व देखरेख विभागाचा देखील संबंध येतो. महानगरपालिकेच्या ब्रिज डिपार्टमेंट कडून याचा सर्वे करण्यात येईल असे सांगण्यात आलं सर्वे झाला. पण, अद्यापही याचे टेंडर निघालेले नाहीत. त्या कामाचे कंत्राटच निघालेला नसल्याने या कामच अद्याप भूमिपूजन रखडलं आहे. अशी माहिती वाजीद यांनी दिली. दरम्यान, या सामाजिक कार्यकर्त्यांच्या लढ्याला आता नेमका कधी न्याय मिळतो हे पहा ना महत्त्वाचं ठरणार आहे. कारण, हिंदू असो की मुस्लिम मरण यातना या वाईटच आणि त्या थांबल्या पाहिजेत.