मुंबई - शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी 'एन-एस ई एल' प्रकरणात घोटाळा करून 78 एकर जमीन खरेदी केली. तसेच, ठाण्यामध्ये अनधिकृत बांधकाम आणि 'एम एम आर डी ए'मध्ये प्रताप सरनाईक यांच्या सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्ट कमिशनमध्ये घोटाळा केला असल्याचा आरोप, भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. किरीट सोमैया यांनी या विरोधात ईडी(सक्तवसुली संचलनालय) कार्यालयात तक्रारही दाखल केली होती. मात्र, जाणुन-बुजून सोमैया आपली बदनामी करत आहेत. केवळ निराधार आणि बेछूट आरोप आपल्यावर ते करत आहेत अस सरनाईक म्हणाले आहेत. याबाबत सरनाईक यांनी ठाणे कोर्टात शंभर कोर्टाचा, दिवाणी दावा दाखल केला आहे.
'खोट्या बातम्या समाज माध्यमात पसरवल्या'
केंद्र व राज्य सरकारच्या संघर्षात महाराष्ट्र राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे आमदार म्हणून केवळ राजकीय हेतुने , सरनाईक यांना बदनाम करण्यासाठी सोमैया आरोप करीत होते. सोमय्या यांनी ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन खोटी वक्तव्ये, खोटी विधाने त्यांच्या सोयीने केली व त्याआधारे खोट्या बातम्या समाज माध्यमात पसरवल्या. जनतेत आमदार सरनाईक यांच्याबद्दल संभ्रम निर्माण करण्यासाठी, त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी सोमैया यांनी हे ठरवून केले असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
'धमक्यांना घाबरणार नाही'
आमदार प्रताप सरनाईक यांनी किरीट सोमय्या यांच्या विरोधात शंभर कोटीचा दावा दाखल केला असला, तरी घाबरणार नाही. प्रताप सरनाईक यांनी केलेला शंभर कोटीचा दावा म्हणजे "चोरांच्या उलट्या बोंबा" असा टोला किरीट सोमय्या यांनी लगावला आहे. आरोप केलेल्या सर्व प्रकरणात प्रताप सरनाईक यांच्यावर कारवाई सुरू असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितला आहे.