मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ओबीसी नेत्यांचा आवाज बंद करण्याचे काम केले, असा आरोप ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. तसेच पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि अनिल गोटे अशा अनेक नेत्यांवर अन्याय केल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपमधील ओबीसी गटाची बाजू मांडण्यासाठी आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शेंडगे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडून भाजपला घरचा आहेर दिला. पत्रकार परिषदेत त्यांच्यासोबत पक्षातील इतर ओबीसी नेते उपस्थित होते. भाजपचा मूळ गाभा बहुजन समाज असून, हा समाज पक्षातून बाहेर पडल्यास भाजप पूर्णपणे संपून जाईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा - #CitizenshipAmendmentBill : स्पष्टता येईपर्यंत राज्यसभेत पाठिंबा देणार नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यावेळी शेंडगे यांनी भाजपच्या पक्षनेतृत्वावर निशाणा साधला. तसेच भाजप सातत्याने ओबीसी समाजावर अन्याय करत असून पक्षाने सर्वाधिक त्रास गोपीनाथ मुंडे यांना दिल्याचे वक्तव्य शेंडगे यांनी केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत ओबीसी समाजाला न्याय देण्याचे आश्वासन दिले होते, यामुळेच आम्ही शिवसेनेसोबत गेल्याचे शेंडगे यांनी स्पष्टीकरण दिले.
आता सर्व ओबीसी नेते एकत्र आले असून, येत्या काही दिवसात पुन्हा बैठक घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.