मुंबई - मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणताही राजकीय पक्ष सोडवणार नाही. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी राजेंना स्वतःची सत्ता स्थापन करावी लागेल. स्वतःची सत्ता आली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. अन्यथा हा प्रश्न सुटणे कठीण आहे, त्यासाठी संभाजी राजेंनी आपली सत्ता कशी स्थापन करावी हे पहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
संभाजी राजेंसाठी ट्रॅप -
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी आंबेडकर बोलत होते. यावेळी बोलताना, मुख्यमंत्री आणि संभाजी राजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवर भेटले आहेत. हा संभाजी राजेंसाठी ट्रॅप आहे. संभाजी राजेंनी त्यात अडकू नये. त्यांना काय हवे ते सरकार देणार आहे का? हे पाहावे असा सल्ला आंबेडकर यांनी दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी यांचे सरकार असताना सुप्रीम कोर्टाने आयोग स्थापन करण्यास सांगितला होता. कोणालाही आरक्षण देताना हा आयोग आधी निर्णय घेईल त्यानंतरच त्या समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आदेश कोर्टन दिले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने या निर्णयाकडे दुर्लक्ष केले. भाजपाने तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात राणे समिती, गायकवाड कमिशन नेमले. या दोन्हीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक सुप्रीम कोर्टाला चॅलेंज देण्याचा प्रयत्न केला यामुळे हे आरक्षण टिकले नसल्याचे कारण आंबेडकर यांनी सांगितले.
ओबीसींचे आरक्षण रद्द नाही -
ओबीसी आरक्षण रद्द झालेले नाही. ओबीसींची जणगणना करून ते आरक्षण द्यावे, असे कोर्टाने सांगितले आहे. राज्य आणि केंद्र सरकार आमच्याकडे ओबीसी समाजाच्या जनगणनेचे आकडे नसल्याचे न्यायालयात सांगत आहेत. मात्र, दोन्ही सरकार खोटे बोलत आहे. सरकारने ही आकडेवारी समोर आणावी अन्यथा माझ्याकडे आकडेवारी आहे. कोणी कुठल्या घरात जाऊन जनगणना केली याची माहिती आम्ही सरकारला देऊ, असे आव्हान आंबेडकर यांनी सरकारला दिले. कोरोनाचे कारण पुढे करून जनगणना करता येणे शक्य नसल्याचे सरकार सांगत असेल तर पुढच्या वर्षी सरकारने ओबीसींची जनगणना करावी, अशी सूचना आंबेडकर यांनी केली.
आता सोनिया गांधी कोणत्या धार्जिन्या? -
माझी कोणत्याही पक्षाबरोबर युती नाही. मी एकटाच आहे. मी स्वबळावर लढतो. मी स्वबळावर लढत असल्याने मला भाजपा धार्जिणे ठरवले जाते. मग आता काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पाटोले यांनी स्वबळाची भाषा केली आहे. जर काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर सोनिया गांधी कोणत्या धार्जिन्या आहेत? असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.