मुंबई - भाजप देशहिताच्या संदर्भात योग्य निर्णय घेत असून देशाचे कधीही वाईट करणार नसल्याचे खासदार प्रज्ञा सिंग ठाकूरने म्हटले आहे. पक्षाने घेतलेले निर्णय देशाला मजबूत करणारे असून सध्या विघटन करणाऱ्या शक्तींचा उन्माद झाल्याचे त्या म्हणाल्या. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सुनावणीसाठी त्या मुंबईत आल्या होत्या.
दिल्लीतील हिंचारानंतर सोनिया गांधी यानी गृहमंत्री अमित शाह यांच्या राजिनाम्याची मागणी केली. यावर बोलताना, सोनिया गांधींच्या मागणीतील नैतिकतेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केले. याचा दाखला देण्यासाठी आणीबाणीच्या व 1984 च्या दंगलींचा उल्लेख खासदार ठाकूर यांनी केला. तसेच काँग्रेसची नैतिकता यावेळी दिसून आल्याची टीका त्यांनी केली.
हेही वाचा : 'कोरेगाव भीमा प्रकरणातील खरे गुन्हेगार अद्याप मोकाट'
2008 मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये मुख्य आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंग यांनी आज एनआयए कोर्टात हजेरी लावली. एनआयए कोर्टाचे न्यायाधीश व्ही.एस. पडळकर यांनी 2019 च्या मे महिन्यात काढलेल्या आदेशानुसार या प्रकरणातील सर्व मुख्य आरोपींना आठवड्यातून एकदा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र प्रज्ञा सिंग जून 2019 नंतर हजर झाल्या नव्हत्या. मुंबई उच्च न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात होणाऱ्या दिरंगाईबद्दल एनआयएकडे स्पष्टीकरण मागितले होते. यासोबतच एनआयए कोर्टाकडून सुनावणी दरम्यान विलंब झाल्याप्रकरणी नाराजी देखील व्यक्त केली होती.
बुधवारी झालेल्या सुनावणी दरम्यान या प्रकरणातील आरोपी चतुर्वेदी याने केस डायरीच्या कागदपत्रांची मागणी केल्यानंतर अशा कोणत्याही प्रकाराची केस डायरी न्यायालयात सादर करण्यात न आल्याचे एनआयएकडून स्पष्ट करण्यात आले. यानंतर न्यायालयाला क्षुल्लक करण देत वेळ वाया घालवल्याबद्दल आरोपी चतुर्वेदीला कोर्टाने 10 हजारांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी पुन्हा 28 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.