मुंबई - कोरोनापासून स्वरक्षण करण्यासाठी डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किट तसेच एन 95 मास्क अत्यावश्यक आहे. त्यामुळे मेट्रो सिटीपासून खेड्यात पाड्यात खासगी डॉक्टरांना पीपीई-किट आणि एन-95 मास्क सहज उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने आता महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता हॉस्पिटलमधील औषध दुकानांमधून पीपीई किटी आणि एन-95 मास्कची विक्री करण्यात येणार आहे.
औषध दुकानातून उपलब्ध होणाऱ्या पीपीई किट आणि एन 95 मास्कच्या किमतीही निश्चित कराव्यात, अशी मागणी अन्न आणि औषध प्रशासना(एफडीए)ने राष्ट्रीय औषध किंमत नियामक प्राधिकरणा (एनपीपीए)कडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या निर्णयामध्ये काही बंधने घालण्यात आली आहेत. महत्वाचे म्हणजे औषध विक्रत्यांना केवळ डॉक्टर, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनाच पीपीई किट, एन 95 मास्क विकता येणार आहेत. कोव्हिड संकट राज्यभरात असताना अनेक खासगी डॉक्टर मात्र घरी बसले आहेत. पीपीई किट आणि एन 95 मास्क उपलब्ध होत नसल्याचे ते कारण देत आहेत. ग्रामीण भागात ही साधने उपलब्ध होणे खासगी डॉक्टरांना कठीण होत आहे. त्यामुळे आता या साधनाची उपलब्धता करून देण्यासाठी हॉस्पिटलमधील औषध दुकानातून पीपीई किट आणि एन 95 मास्कची विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आता लवकरच ही विक्री सुरू करण्यासाठी पीपीई किट आणि एन-95 मास्कच्या किमती निश्चित करत विक्रेत्यांचा नफा निश्चित करणे गरजेचे आहे. त्यामुळे एफडीएने एनपीपीएला पत्र लिहित निश्चित किमती जाहीर करण्याची मागणी केल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.