मुंबई - शिवेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची आज शपथ घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनाभवनाजवळ लावण्यात आलेला एक फलक लक्षवेधी ठरत आहे. या फलकात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्याबरोबरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत.
शिवसेनाप्रमुखांचे शरद पवार व इंदिरा गांधी यांच्याबरोबरील फोटो असलेला फलक हा आमदार सदा सरवणकर व नगरसेवक सदा समाधान यांनी सेनाभवनाजवळ लावला आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याने बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले, अशी भावना त्यांनी फलकातून व्यक्त केली आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे अर्थात महाविकासआघाडीचे सरकार अस्तित्वात येत आहे. उद्धव ठाकरे हे शिवाजी पार्कमध्ये सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटाला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
शिवसेनाप्रमुखांनी इंदिरा गांधींच्या निर्णयांना दिला होता पाठिंबा-
पंतप्रधान इंदिरा गांधींनी 1975 ला देशात आणीबाणी घोषित केली होती. या निर्णयाला देशभरातून विरोध होत असताना बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. काँग्रसेच्यावतीने राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून असलेल्या प्रतिभा पाटील यांनाही बाळासाहेब ठाकरेंनी निवडणुकीत पाठिंबा देण्याची स्पष्ट भूमिका घेतली होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व शरद पवार यांच्यात वैचारिक मतभेद होते. मात्र, त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबध वेळोवेळी दिसून आले होते.
हेही वाचा-सिंहासन महाराष्ट्राचे : राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद तर, काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद
संजय राऊतांचे भाजपवर टीकास्त्र-
गेली 25 वर्षे भाजपने महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील निवडणुका जिंकण्यासाठी बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरल्याची संजय राऊत यांनी टीका केली.
हेही वाचा-उद्धव ठाकरेंचा फोनवरून पंतप्रधानांशी संवाद; शपथविधी सोहळ्याचे दिले निमंत्रण
असे आहे प्रमुख राजकीय पक्षांचे बलाबल-
विधानसभा निवडणुकीत भाजने सर्वात जास्त 105 जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने 54, शिवसेनेने 56 व काँग्रेसने 44 जागा जिंकलेल्या आहेत. राज्यात सत्तास्थापनेसाठी प्रथमच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे महाविकासआघाडी अस्तित्वात आली आहे.