मुंबई - एकीकडे कोरोनाच्या काळात एसटी महामंडळाच्या मालवाहतूक ट्रकांनी अवघ्या वर्षभरात ’महाभरारी’ घेतली आहे. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांचे 'महा हाल' होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मालवाहतुकीवर जाणाऱ्या चालकांना मुक्कामासाठी लागणारा वेळ, नाष्टा आणि जेवणाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनसुद्धा महामंडळाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. यामुळे एसटी कामगार संघटना महामंडळाच्या कारभारावरून आक्रमक झालेल्या आहेत.
सतत कामगारांकडे दुर्लक्ष
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गेल्यावर्षी लॉकडाऊन घोषित केला होता. शासनाच्या कडक निर्बंधामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तसेच इतर मालांच्या वाहतूकीवर विपरित परिणाम झाला होता. यापरिस्थितीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने मालवाहतूक क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार २१ मे २०२० पासून राज्यभरात अतिशय माफक दरात मालवाहतूक सेवा सुरू केली. मात्र, एसटीच्या मालवाहतुकीसाठी जाणाऱ्या एसटी चालकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सध्या लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरू असल्याने एसटी महामंडळ बंद आहे. अशावेळी मूळ विभागात परतीच्यावेळी चालकाला खासगी गाड्यांनी स्वखर्चाने जावे यावे लागते. तसेच हॉटेल व्यवसाय बंद असल्याने चालकांना मुक्कामासाठी लागणारा वेळ, नाष्टा आणि जेवणाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. शासनाच्या नवीन आदेशानुसार आता माल वाहतूकीची व्याप्ती वाढणार आहे. त्यामुळे मालवाहतूक करताना येणाऱ्या समस्या तत्काळ दूर करणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांना निवेदन दिले आहे, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा - भुताटकीसारखे शब्द वापरणे म्हणजे पोरखेळ - देवेंद्र फडणवीस
या आहेत समस्या -
मालवाहतूक करताना १० टनांपेक्षा जास्त माल भरला जाणार नाही अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात १० टनांपेक्षा जास्त माल भरला जात आहे. २०० किमी पेक्षा कमी अंतरासाठी चालकासोबत सहकर्मचारी दिला जात नाही. त्यामुळे मालाची चढउतार करताना, गाडी मागे पुढे घेताना अडचणी निर्माण होतात. एका विभागाच्या मालवाहतूकीचे वाहन अन्य विभागात गेल्यास कर्मचाऱ्यांना २ दिवसांपेक्षा जास्त थांबवून घेऊ नये अशा सूचना असतानाही प्रत्यक्षात ४ ते ५ व त्यापेक्षा अधिक दिवस कर्मचाऱ्यांना थांबून रहावे लागते. तसेच त्या ठिकाणी राहण्याची व नाष्टा / जेवणाची व्यवस्था केली जात नाही. मालवाहतूकीच्या कामावरील कर्मचाऱ्यांना लॉकडाऊनमुळे गाडी रखडल्यानंतर आठवडा सुट्टी जागेवरच घेण्याची सक्ती केली जाते. तसेच अन्य विभागात असणारी मालवाहतूकीची गाडी तेथून पुढे मालवाहतूक करण्यासाठी मूळ विभागातून कर्मचारी पाठवले जातात. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शासकीय आदेशानुसार ५५ वर्षे व त्यापुढील चालकांना मालवाहतूकीसाठी पाठवण्यात येत आहे.
३०० रुपये विशेष भत्ता द्या -
मालवाहतूक करणाऱ्या चालकांना येणाऱ्या समस्या विचारात घेऊन त्या तातडीने दूर कराव्यात. तसेच मालवाहतूक करताना चालकांना मुक्कामासाठी लागणारा वेळ, नाष्टा आणि जेवणाची होणारी गैरसोय विचारात घेऊन मालवाहतुकीवर कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज रुपये ३०० विशेष भत्ता देण्यात यावा. तसेच मुक्कामाच्या ठिकाणी राहण्यासाठी प्रशासनाकडून सोय करण्यात यावी, अशी मागणीसुद्धा महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा - सारथी संस्थेकडे अडकलेली फेलोशिप जूनमध्ये मिळेल - विनायक मेटे