ठाणे : एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ ( Political crisis in Maharashtra ) घडून आली. एकनाथ शिंदे यांच्या गटातील अंबरनाथ विधानसभा (अनुसूचित जाती) मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याविरोधात अंबरनाथ शहरात ठिकठिकाणी बॅनर ( Banners in Ambernath ) लावण्यात आले आहे. ‘हो मी गद्दार आहे’ असा संदेश लिहिलेले आणि डॉ. बालाजी किणीकर ( Rebel MLA Kinikar ) यांचे छायाचित्र असलेले कागदी बॅनर लावण्यात आले आहेत. अंबरनाथ शहरातील काही शिवसेना आणि युवा सेना पदाधिकारी सुरुवातीपासूनच समाज माध्यमांवर डॉ. किणीकर यांचा विरोध करीत आहेत.
अंबरनाथ मतदारसंघात शिवसेनेत फूट : शिवसेनेशी बंडखोरी करीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान उभे केले आहे. त्यांच्या या बंडखोरीत राज्याच्या विविध भागांतील आमदार सहभागी आहेत. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनीही एकनाथ शिंदे यांना उघड पाठिंबा देत त्यांच्या गटात सामील झाले आहेत. सध्याच्या घडीला डॉ. किणीकर गुवाहाटीमध्ये बंडखोर आमदारांसोबत आहेत. डॉ. बालाजी किणीकर बंडखोर आमदारांसमवेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरुवातीला अंबरनाथ शहरातून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, दोन दिवसानंतर समाज माध्यमांवर किणीकर यांचा निषेध केला गेला. पूर्व भागात काही ठिकाणी डॉ. किणीकर आणि एकनाथ शिंदे यांचे समर्थन करणारे बॅनर लावण्यात आले होते. मात्र, त्यातील काही बॅनर परत काढण्यातही आले.
डाॅ. किणीकर यांचे फलक लावण्यात आले : डॉ. बालाजी किणीकर हे एकनाथ शिंदे आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात. शनिवारी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उल्हासनगर शहरातील कार्यालयाची शनिवारी तोडफोड केल्यानंतर एकच खळबळ उडाली. हे प्रकरण ताजे असतानाच अंबरनाथ शहरात उड्डाणपूल आणि मध्यवर्ती भागात डॉ. किणीकर यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. ‘हो मी गद्दार आहे’, असा संदेश लिहिलेले आणि डॉ. किणीकर यांचे छायाचित्र असलेले फलक काही ठिकाणी चिटकवण्यात आले आहेत. त्यामुळे उल्हासनगर पाठोपाठ आता अंबरनाथ शहरातही शिवसेनेत फूट दिसून आली असून डॉ. किणीकर यांचा उघड विरोध केला जातो आहे. तर दुसरीकडे बॅनर लावण्याची माहिती मिळताच अंबरनाथ पोलिसांनी हे फलक काढण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : Maharashtra Political Criris : शिवसेनेच्या बंडखोर गटाची 'या' कारणासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव