मुंबई - महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांचे रिंगणात आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रत्येकी दोन आणि भाजपाचे 5 असे 11 उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीत चुरशी वाढली आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषदेच्या ( Vidhan Parishad Elections 2022 ) निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. सदाभाऊ खोत यांनी देवेंद्र फडणवीसांची सूचना आल्यास अर्ज मागे घेणार असल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने भरलेला तिसरा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. राष्ट्रवादीच्या शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गर्जे यांनी डमी अर्ज दाखल केला होता. विधानपरिषद निवडणुकीत या उमेदवारांची राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी ( Political history of MLC candidates ) नेमकी काय आहे? याचा आढावा घेणारा रिपोर्ट...
शिवसेनेने विधानपरिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर आणि आमश्या पाडवी तर, राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे आणि रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाने प्रवीण दरेकर, राम शिंदे प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय, उमा खापरे यांना उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत सचिन अहिर ? : १९९९ मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २००४ आणि २००९ मध्ये ते पुन्हा विजयी झाले. २००९ मध्ये त्यांच्यावर गृहनिर्माण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची धुरा होती. २०१४ मध्ये त्यांना शिवसेना उमेदवार सुनील शिंदे यांच्याकडून पराभवाचा धक्का बसला. २०१९ मधील विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. त्यावेळी ते मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी होते. आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून विजयी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. आदित्य ठाकरेंसाठी मैदान मोकळं केल्याची त्यांना बक्षिसी मिळताना दिसत आहे. २०२० मध्येच त्यांना शिवसेना उपनेतेपद बहाल करण्यात आलं होतं, तर २०२१ त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं होतं. आता त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती होताना दिसत आहे.
कोण आहेत आमशा पाडवी ? : आमशा पाडवी हे मूळचे शिवसैनिक आहेत. शिवसेनेत गेल्या अनेक वर्षांपासून ते काम करत आहेत. शिवसेनेला नंदूरबार जिल्ह्यात उभं करण्याचं काम त्यांनी केलं आहे. हा अत्यंत दुर्गम भाग आहे. कोणतीही साधनं नसतानाही पाडवी यांनी शिवसेना रुजवण्याचं काम केलं आहे. ते नंदूरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण 2019च्या निवडणुकीत आमशा पाडवी यांनी 80 हजार 777 मते घेतली होती.
कोण आहेत एकनाथ खडसे ? : एकनाथ खडसे हे भाजपाचे ज्येष्ठ नेते होते. मात्र, ८ मे २०२० एकनाथ खडसे विधानपरिषदेच्या उम्मेदवारीसाठी उत्सुक होते, त्यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून त्यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी करण्यात आली होती. पण, त्यांना उमेदवारी दिली गेली. २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसेंनी भाजपा सोडला. भाजपा सोडल्यानंरत माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांमुळे आपण पक्ष सोडत आहोत. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. आता राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.
कोण आहेत रामराजे निंबाळकर? : रामराजे निंबाळकर 1991 मध्ये फलटण पालिकेचे नगराध्यक्ष झाले. 1995 मध्ये सर्वप्रथम ते फलटण विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते. राज्यातील अपक्ष 22 आमदारांची मोट बांधून त्यांनी शिवसेना नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. मनोहर जोशी आणि रामराजे निंबाळकर यांनी त्याच सुमारास फलटणमध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली. त्यामध्ये रामराजेंना कृष्णा खोऱ्याचे उपाध्यक्षपद देण्यात आले. शरद पवार यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी रामराजे राष्ट्रवादीसोबत गेले होते. त्यानंतर आघाडी सरकारच्या काळात विलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी असताना रामराजेंना महसूल राज्यमंत्रिपद देण्यात आले. 2004 मध्ये त्यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाची धुराही देण्यात आली होती. 2013 मध्ये रामराजेंना राज्य नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष करण्यात आले. दरम्यान, शरद पवार यांनी २०१० मध्ये रामराजेंना विधान परिषदेवर संधी दिली. सध्या ते विधान परिषदेचे सभापती आहेत. त्यांना तिसऱ्यांदा विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली आहे.
कोण आहेत भाई जगताप? : भाई जगताप यांचं खरं नाव अशोक अर्जुनराव जगताप आहे. मात्र, कामगार चळवळीपासून त्यांची भाई जगताप अशीच ओळख निर्माण झाली आहे. भाई जगताप यांच्या राजकीय कारकिर्दीला विद्यार्थी चळवळीपासून सुरुवात झाली. विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी एनएसयूआय या विद्यार्थी संघटनेत काम करण्यास सुरुवात केली. नंतर युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षात सक्रिय झाले. याचवेळी भारतीय कामगार कर्मचारी महासंघातून त्यांनी कामगारांचे प्रश्न सोडवण्यास सुरुवात केली. नव्वदच्या दशकात त्यांनी अनेक आंदोलने उभी केली. मुंबईतील इंजीनियरिंग कारखान्यांमध्ये त्यांच्या युनियनने चांगलाच जोर पकडला होता. कामगारांची शक्ती उभी करण्यात त्यांना यश आलं. त्यामुळे आपोआपच काँग्रेसमधील त्यांची ताकद वाढली. कामगार नेते म्हणून नावारुपाला आल्यानंतर काँग्रेसने त्यांना 1999 मध्ये कोकणातील दापोली-मंडणगडमधून तिकीट दिलं. पण पहिल्याच निवडणुकीत त्यांना अपयश आलं. त्यानंतर 2004 मध्ये त्यांना मुंबईतील खेतवाडी विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं. काँग्रेसचा कधीही विजय न झालेल्या या मतदारसंघातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर ते मुंबई महापालिकेतून विधानपरिषदेवर गेले. आता पुन्हा एकदा काँग्रसने त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली आहे.
कोण आहेत चंद्रकांत हंडोरे? : चंद्रकांत हंडोरे हे मुंबईतील चेंबुर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात त्यांनी सामाजिक न्याय मंत्री म्हणून धुरा सांभाळली होती. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ते उपाध्यक्ष आहेत. नोव्हेंबर २०२० मध्ये नाशकात झालेल्या बैठकीत भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसकडून आमच्यावर अन्याय होतो, असा आरोप करत चंद्रकांत हंडोरेंनी गेल्या वर्षी खळबळ उडवून दिली होती. आगामी काळात भीमशक्ती संघटनेचं पक्षात रुपांतर करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली होती. राज्यात स्वबळावर निवडणूक लढवण्याचंही हंडोरे म्हणाले होते. त्यामुळे ते पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या शक्यतेला खतपाणी मिळालं होतं. २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीत हंडोरे काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेच्या रिंगणात उतरले होते, मात्र शिवसेनेच्या प्रकाश फातर्पेकर यांच्याकडून त्यांना पराभवाचा धक्का स्वीकारावा लागला होता. तर त्यानंतर झालेल्या विधान परिषद निवडणुकीचं तिकीट न मिळाल्याने त्यावेळी हंडोरे नाराज असल्याची चर्चा होती. मात्र आता त्यांना संधी देण्यात आली आहे.
कोण आहेत प्रवीण दरेकर? : मनसेचे आक्रमक नेते म्हणून प्रवीण दरेकर हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित होते. २००९ मध्ये मनसेने निवडणूक लढवली. त्यावेळी दरेकर पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. मुंबईतल्या मागाठाण्यातून त्यांनी दणदणीत विजय मिळवला होता. २००९ ते २०१४ या कालावधीत ते मनसेचे आमदार होते. नंतर झालेल्या निवडणुकीत मोदींच्या लाटेचा मोठा फटका महाराष्ट्रात मनसेलाही बसला. २०१४च्या निवडणुकीत दरेकर यांच्यासह मनसेचे अनेक शिलेदार पराभूत झाले. त्यानंतर मनसेला गळती लागण्यास सुरुवात झाली. अनेक नेत्यांनी भाजपाकडे मोर्चा वळवला. त्यातच दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबै बँकेचा घोटाळा बाहेर आल्यानंतर चौकशी सुरू झाली. त्यानंतर २०१५ मध्ये दरेकरांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यावर आताचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणीस यांच्या खास मर्जीतले दरेकर झाले. त्यामुळे अनेक दिग्गजांना डावलून फडवणीस यांनी त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावली. एवढेच नव्हे तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदही त्यांना दिले गेले. आता भाजपने पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावून त्यांचे विरोधी पक्षनेते पदही कायम ठेवलं आहे.
कोण आहेत राम शिंदे? : नगर जिल्ह्यातील माजी मंत्री व भाजपा नेते प्रा. राम शिंदे यांना पक्षाने विधान परिषदेवर संधी दिली आहे. शिंदे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि ओबीसी समाजाचे नेते आहेत. मंत्री असताना अनेक खाती सांभाळण्याचा अनुभव त्यांच्याकडे असून पक्षात विविध पदांवर कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता त्यांना परिषदेवर आमदारकी मिळावी अशी अपेक्षा त्यांच्या समर्थकांडून व्यक्त केली जात होती. यापूर्वी कर्जत-जामखेड मतदारसंघातून शिंदे आमदार होते. युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री झाले. तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांचे ते निकटवर्तीय मानले जातात.
कोण आहेत श्रीकांत भारतीय? : विधान परिषदेच्या स्पर्धेतील अनेक ज्येष्ठ नेत्यांना डावलत भाजपाने श्रीकांत भारतीय यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. श्रीकांत भारतीय हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आहेत. भाजपाचे अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना भारतीय हे फडणवीसांचे ओएसडी होते. भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणीत सदस्य आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या वॉर रुमचे ते प्रमुख होते. शिवसेनेवर सातत्याने टीका करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांपैकी ते एक आहेत.
कोण आहेत उमा खापरे? - उमा खापरे या भाजपाच्या अत्यंत आक्रमक नेत्या आहेत. त्या भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. त्यांनी भाजपामध्ये महिला मोर्चा प्रदेश सचिवपदासह संघटनेत विविध महत्त्वाची पदे भूषविली आहेत. भाजपामधील जुन्या नेत्या म्हणूनही त्यांची ओळख आहे. त्या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थक म्हणूनही ओळखल्या जातात. उमा खापरे या पिंपरी-चिंचवडच्या आहेत. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेविका म्हणून चांगले काम केलं आहे. सलग दोनवेळा त्यांनी नगरसेविका म्हणून काम केलं आहे. २००१-२००२ मध्ये त्या पिंपरी चिंचवड पालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या.
कोण आहेत प्रसाद लाड ? : एकेकाळचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळांचे खंदे समर्थक असणारे प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादीची सत्ता जाताच भाजपामध्ये प्रवेश केला. २०१४ ची विधानसभा निवडणूक त्यांनी मुंबईत राष्ट्रवादीकडून लढविली आणि ते भाजपाकडून पराभूत झाले होते. त्यानंतर काही महिन्यांत झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ते अपक्ष लढले. त्या वेळी भाजपाने त्यांना पाठिंबा दिला, पण ते केवळ दोन मतांनी पराभूत झाले. मुंबई महापालिकेतून विधान परिषदेवर निवडून द्यावयाच्या दोन जागांसाठीची ती निवडणूक होती. त्यात शिवसेनेचे रामदास कदम आणि काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निमित्ताने लाड हे तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे झाले. २०१७ साली भाजपा नेते नारायण राणे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर झालेल्या पोटनिवडणुकीत प्रसाद लाड विजयी झाले. प्रसाद लाड हे देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातिल एक नेते आहेत. महाविकास आघडी सरकारवर प्रहार करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. पक्षाने त्यांना पुन्हा एकदा आमदारकीची संधी दिल्याने त्यांच्या समर्थकांत आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा - Vidhan Parishad Elections 2022 : छोटे पक्ष व अपक्ष आमदारांची मत ठरणार निर्णायक!