मुंबई - राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असली तरीही, आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये सत्ता स्थापनेवरून अद्याप चर्चा सुरू आहे. अजूनही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय आघाडीने अधिकृतरित्या जाहिर केला नसला तरीही, किमान समान मुद्द्यांवर एकत्र येण्याचा निर्णय होणार असल्याचे आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे.
सत्तास्थापनेचा दावा करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून शिवसेनेला समर्थनाचे पत्र देण्यात आलेले नाही. यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सेनेने दोन दिवसांचा अवधी मागितला होता. मात्र, राज्यपालांनी सेनेला मुदत वाढवून देण्यास नकार दिला.
किमान समान कार्यक्रम तिन्ही पक्षात झाला नसल्याने अधिकृत पत्र दिले नसल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले.
शिवसेना हा प्रादेशिक पक्ष हिंदुत्ववादी आणि महाराष्ट्राची अस्मिता या विचारधारेवर आधारलेला पक्ष असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची अडचण झाली असून, सध्या सेनेसोबत किमान समान कार्यक्रम आखण्याची तयारी सुरू झाली आहे.
या किमान समान कार्यक्रमात भूमीपुत्रांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, अल्पसंख्यांकांचे प्रश्न तसेच मुस्लिम आरक्षण या विषयावर शिवसेनेचे मत विचारात घेतले जाणार आहे. त्याचसोबत हिंदी भाषिकांचा जनाधार असलेल्या काँग्रेसला परप्रांतीयांच्या मुद्यावरही तिन्ही पक्षात किमान समान कार्यक्रम आखावा लागणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच आघाडीचा जाहिरनामा आणि शिवसेनेचा वचननामा यामधील समसमान आश्वासने संबंधित कार्यक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहेत.