मुंबई - वरळी कोळीवाड्यातील कोरोनाने संक्रमित झालेल्या 129 जणांनी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर पुन्हा त्यांच्या घरी परतल्यावर पोलीस आणि नागरिकांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. गेल्या काही दिवसांपासून वरळी कोळीवाडा येथे कोरोना संक्रमित रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. त्यामुळे हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला होता. वरळी कोळीवाड्यात 80 हजार लोकसंख्या असून यात 32 हजार घर असल्याने नागरिक दाटीवाटीने राहत होते.
काही दिवसांपूर्वी संपर्कामुळे शेकडो नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 129 नागरिकांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सोमवारी आणि मंगळवारी स्वॅब टेस्टिंग केल्यावर या 129 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.
कोरोनाच्या महासंकटातून सावरून आल्यावर या नागरिकांच्या शेजाऱ्यांनी व पोलिसांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले.