मुंबई - 2019 मध्ये गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका पबवर कारवाई करताना तीन जणांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करून पोलिसांना मारहाण करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी दाखल केला होता. नंतर या संदर्भात तत्कालीन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख परमबीर सिंग यांच्याकडून दबाव टाकला गेल्याच्या आरोपावर पोलीस निरीक्षक अरुण डांगे हे कायम असल्याचं अनुप डांगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले आहे.
अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या जितू नलवाणी व डायमंड व्यवसायात मोठे नाव असलेल्या भरत शहा यांच्यासह तिघांच्या विरोधात या अधिकाऱ्याने कारवाई केली होती. मात्र, या कारवाईनंतर परमबीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्त पदावर येताच केवळ तिसऱ्या दिवशीच या पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात विभागीय चौकशी सुरू करण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात आले होते.
आयुक्त पदावर आल्यावर परमबीर सिंग यांनी केले निलंबित
त्या दिवसानंतर परमबीर सिंग यांच्या कार्यालयामधून अनुप डांगे यांना भेटण्यासाठी फोन आले होते. या संदर्भातील माहिती अनुप डांगे यांनी तत्कालीन पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना दिल्यानंतर त्यांनी परमबीर सिंग यांना भेटण्यासाठी जाण्यास स्पष्ट नकार द्यावा, असं सांगून तसे लेखी पत्र व्यवहारसुद्धा करण्यास सांगितला होता. संजय बर्वे हे पोलीस आयुक्त पदावरून पायउतार झाल्यानंतर परमबीर सिंग यांनी पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना निलंबितसुद्धा करण्यात आले होते. या दरम्यान त्यांनी दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा - देशमुखांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच नाही; तपासाची दिशा बदलण्यासाठीच आरोप - पवार
अनुप डांगे यांनी पब चालक जितू नवलानी आणि भरत शहा यांच्याविरोधात पोलीस कारवाईत अडथळा निर्माण करणे, पोलिसांना मारहाण करणे यासारखे गुन्हे दाखल केले होते. हे गुन्हे मागे घ्यावेत म्हणून त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. मात्र, त्यांनी त्यास नकार दिल्यामुळे त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर यासंदर्भात अनुप डांगे यांनी अतिरिक्त गृहसचिव यांना यासंदर्भात पत्र लिहून तक्रार दाखल केली होती. यानंतर अनुप डांगे यांच्याकडे शार्दुल बायास या व्यक्तीने तो परमबीर सिंग यांचा चुलत भाऊ सांगून पुन्हा सेवेत घेण्यासाठी 50 लाखांची मागणी त्यांच्याकडे केली होती. या संदर्भात चौकशीची मागणी अनुप डांगे या पोलीस अधिकाऱ्याने केली आहे.
परमबीर सिंग यांना अशा लोकांचा कळवळा का?
पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी दावा केला आहे की, ज्यात जितू नलवानीवर कारवाई केली होती त्याची चौकशी केल्यास त्याच्या मोबाईल फोनमध्ये 500 हुन अधिक आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन नंबर मिळून येतील. आयपीएस अधिकाऱ्यांसोबत हे आरोपी पेज थ्री पार्ट्या करून अंडरवर्ल्डशी संपर्क साधत असल्याचा आरोपही अनुप डांगे यांनी त्यांच्या तक्रारीत केलेला आहे. परमबीर सिंग यांना अशा प्रकारच्या व्यक्तींना घेऊन कळवळा का येतो? असा सवालही अनुप डांगे हे विचारत आहेत.
कोण आहे भरत शहा
बॉलीवुड चित्रपट सृष्टीतील मोठ्या निर्मात्यांपैकी एक असलेल्या भरत शहाला 2001 मध्ये अंडरवर्ल्ड क्षेत्रातून फायनान्स करण्यात आलेल्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटाच्या संदर्भात अटक करण्यात आली होती. 2003 मध्ये यासंदर्भात त्याच्यावर गुन्हा सिद्ध झालेला होता. भरत शहा याला या संदर्भात 1 वर्षाची शिक्षा झाली होती. मात्र खटला चालू असताना चौदा महिने त्याने तुरुंगात घालवल्यामुळे त्याची ही एक वर्षाची शिक्षा पूर्ण झाली होती. नाजीम रिजवी व त्याचा असिस्टंट अब्दुल रहिम अल्लाबक्ष खान या दोघांनाही यासंदर्भात 6 वर्षाची शिक्षा तर पंधरा हजारांचा दंड झाला होता.
हेही वाचा - शरद पवारांकडून गृहमंत्री अनिल देशमुखांना वाचवण्याचा प्रयत्न - सुधीर मुनगंटीवार