मुंबई - पीएमसी बँकेच्या आणखी एका खातेदाराचा वैद्यकीय उपचारासाठी पैसे न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना मुलुंड परिसरात घडली आहे. मुरलीधर दर्रा (वय 80) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. वडिलांच्या मृत्यूस पीएमसी बँकच जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या मुलांनी केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पीएमसी बँक खातेदारांचा हा चौथा मृत्यू आहे.
काही दिवसांपूर्वीच पीएमसी बँकेत लाखो रुपये अडकून राहिल्याने मानसिक तणावातून हृदयविकाराच्या झटक्याने संजय गुलाटी (वय 51) व फतेमुल पंजाबी (वय 59) या खातेदारांना जीव गमवावा लागला होता. तर, पीएमसी बँकेत करोडो रुपयांची रक्कम असलेल्या अंधेरीतील डॉ. योगिता बिजलानी यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना मुरलीधर दर्रा यांच्या मृत्यूने पीएमसी बँक खातेदारांच्या बळीची संख्या चार झाली आहे
मुलुंडच्या कॉलनी परिसरामध्ये राहणारे मुरलीधर दर्रा यांच्यावर बायपास सर्जरीसाठी पैशांची गरज होती. परंतु पीएमसी बँकेत सर्व पैसे अडकले असल्यामुळे उपचारासाठी पैसा कसा उभा करायचा हा प्रश्न त्यांच्या कुटुंबीयांसमोर होता. अशात अचानक मुरलीधर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं.
हेही वाचा - मुंबईत मोदींचे भाषण सुरू होताच... कार्यकर्त्यांनी घेतला काढता पाय
मुरलीधर दर्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांचे पीएमसी बँकेमध्ये गुंतवणूक होती. त्यांच्या कुटुंबीयांचे तब्बल 70 ते 80 लाख रुपये पीएमसी बँकेत अडकले आहेत. मुलगा प्रेम दर्रा यांनी बँकेत बरेच प्रयत्न केले व आपला व्यवसाय वडीलांच्या उपचारासाठी काही दिवस बंद करून बँकेत फेऱ्या मारल्या पण, काही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या वडिलांच्या मृत्यूला पीएमसी बँकच जबाबदार असल्याची प्रतिक्रिया दिली.