मुंबई - महापरिनिर्वाण दिनी ( Mahaparinirvan Din ) चैत्यभूमीवर देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( B. R. Ambedkar ) यांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यंदा प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) दृक्-श्राव्य माध्यमातून या अनुयायांशी संवाद साधणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त विशेष कार्यक्रम -
महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर देशभरातून लाखो आंबेडकर अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या अनुयायांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दृकश्राव्य माध्यमातून संवाद साधणार आहेत. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने केंद्र सरकारने हा कार्यक्रम आखला असून त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारने पालिकेच्या विभाग कार्यालयाला दिले आहेत.
कोरोना निर्बंध हटल्याने अनुयायांची संख्या वाढणार -
चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांची थांबण्याची सोय दादर, शिवाजी पार्क येथे केली जाते. गेल्या वर्षी कोरोनामुळे महापरिनिर्वाण दिनावर निर्बंधांचे सावट होते. मात्र, यंदा निर्बंध नसल्याने पूर्वी प्रमाणे मोठ्या संख्येने अनुयायी अभिवादनासाठी येण्याची शक्यता आहे. यंदाचे वर्ष स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जमलेल्या अनुयायांची संवाद साधणार आहेत. त्याकरता शिवाजी पार्क येथे नियोजन केले जाणार आहे. हे नियोजन कसे असावे याबाबत केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने राज्य सरकारला कळवले आहे. राज्याने पालिकेच्या विभाग कार्यालयाला त्याबाबत कळवले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, रत्नागिरी व मुंबई अशा चार ठिकाणी महापरिनिर्वाणदिन आणि अमृत महोत्सव असा एकत्रित कार्यक्रम आयोजित केला आहे.