मुंबई - सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत. राज्य सरकार कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. तर दुसरीकडे राज्यातील भाजपचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांवर टीका करत आहेत. त्यामुळे पंतप्रधान कौतुक आणि राज्यातील भाजप नेते टीका करत असल्यामुळे भाजपच्या दुहेरी प्रतिक्रिया समोर येत आहेत.
हेही वाचा - देशभरात कोरोनाने २२९ कर अधिकाऱ्यांचे मृत्यू-अनुराग ठाकूर
पंतप्रधानांकडून राज्य सरकारचे कौतुक
सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारकडून सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माहिती घेतली आहे. पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यावेळी मोदींनी राज्य सरकार कोरोनाविरोधात करत असलेल्या उपाययोजनांचे कौतुक देखील केले आहे. दरम्यान, राज्याला ऑक्सिजनचा आणखी पुरवठा वाढवावा तसेच इतर कंपन्यांची लस खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागण्या यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केल्या आहेत.
फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
दुसरीकडे राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे कोरोना संदर्भातल्या उपाययोजनांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. कोरोनाच्या परिस्थितीबाबत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. मुंबईतील कोरोना मृत्यूंची नेमकी आकडेवारी उघड न होणे, चाचण्यांच्या प्रकारातील तडजोडी करत कोरोनाचा संसर्ग दर कमी होत असल्याचे आभासी प्रतिमा उभे करणे आणि त्यातून कोरोना संकटाची प्रत्यक्ष स्थिती निदर्शनास न येता कोरोनाविरोधातील लढ्यात बाधा उत्पन्न होणे हे प्रकार तत्काळ थांबवण्यात यावेत, अशी मागणी फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे.
हेही वाचा - तुरुंगांमधील कैद्यांना गतवर्षीप्रमाणे ९० दिवसांचा पॅरोल द्या- सर्वोच्च न्यायालय