मुंबई - मुंबई आणि उपनगरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना खबरदारी म्हणून मध्य रेल्वेने नुकतेच मुंबई विभागातील 7 प्रमुख रेल्वे स्थानकावरील 10 रुपयांचे प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये केले. तसेच आता नाशिक, नागपूर, अमरावती, जळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे या जिल्ह्यातील रेल्वेचे प्लॅटफॉर्म तिकीट सुद्धा पन्नास रुपये करण्यात आलेली आहे. त्यामुळे पाच पटीने दर वाढविल्याने प्रवाशांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले होते.
चार पटीने वाढवली प्लॅटफॉर्म तिकीटाचे दर -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर म्हणून गेल्या वर्षी रेल्वे स्थानकावर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेकडून रेल्वेच्या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर चार पटीने वाढवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर लॉकडाऊननंतर प्लॅटफॉर्म तिकीट देणे बंद केले होते. मात्र, मुंबई उपनगरातील महत्वाच्या 7 रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म रेल्वे तिकीट देण्यात निर्णय घेतला होता. या प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर 10 वरून 50 रुपये करण्यात आले आहेत. ज्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल आणि भिवंडी रोड या स्थानकांचा समावेश आहे.
हे ही वाचा - आता बोला.. रुग्णाची अँटीजेन चाचणी पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर निगेटिव्ह
राज्यातील 'या' स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट 50 रुपये -
मुंबई विभागातील प्लॅटफॉर्म तिकीट चार पटीने वाढल्यानंतर आता मध्य रेल्वेने भुसावळ विभागातील नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, शेगाव, अकोला, बडनेरा, अमरावती, खांडवा आणि नागपूर विभागातील नागपूर स्थानकात प्लॅटफॉर्म तिकीट ५० रुपये केले आहे. प्लॅटफॉर्म तिकीटामुळे वयोवृद्ध आणि दिव्यांग प्रवाशांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी किंवा आणण्यासाठी त्यांचे नातेवाईक रेल्वे स्थानकावर येणे शक्य झाले आहे. मात्र, हीच सुविधा देण्यासाठी उत्तरीय रेल्वेच्या दिल्ली विभागात 10 रुपयांवरून 30 रुपये केले आहेत. तर, मध्य रेल्वेवर 10 रुपयांवरून 50 रुपये केले आहेत.
हे ही वाचा - 'एनआयएने केलेली कारवाई म्हणजे मुंबई पोलिसांच्या अधिकारावर अतिक्रमण'
रेल्वेचा मनमानी कारभार -
उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघाचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी सांगितले की, मध्य रेल्वे प्रवाशांचा कोणताही विचार न करता प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरामध्ये वाढ केली आहे. मध्य रेल्वेने महसूल मिळविण्यासाठी चार पटीने दर वाढ केली आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या वृद्ध, दिव्यांग, रुग्ण यांना आणखीन आर्थिक गर्तेत अडकवले जात आहे. मध्य रेल्वे प्रवासाचा विचार न करता प्रवाशांकडे दुर्लक्ष करून मनमानी कारभार चालविला जात आहे.