मुंबई - एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला फोटो ट्विट केला. यावरूनदेखील आता पुन्हा राजकारण तापताना दिसतंय (Supriya Sule sitting on Chief Ministers chair). राष्ट्रवादी काँग्रेसकडून शितल म्हात्रे यांनी ट्विट केलेला फोटो हा खोटा असल्याचा दावा केला आहे (fake photo of Supriya Sule). तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळातील खरा फोटो असून कोविड काळात पंतप्रधानांनी घेतलेल्या ऑनलाईन मीटिंग घेतानाचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये शेजारी तात्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तसेच तात्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे हे शेजारी बसले आहेत. मात्र मुख्यमंत्र्यांची खुर्ची ही रिकामी आहे. मुख्यमंत्री ऑनलाईन या बैठकीला उपस्थित होते. मात्र हाच फोटो शितल मात्रे यांनी मॉर्फ करून ट्विट केला असल्याचे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आले आहे.
![सुप्रिया सुळे यांचा फोटो खोटा असल्याचा दावा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/16460160_484_16460160_1664002264037.png)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती नलावडे यांच्या ट्विटर हँडलवरून शितल म्हात्रे यांनी केलेले ट्विट दाखवण्यात आले आहे. सुप्रिया सुळे त्या बैठकीला उपस्थित नव्हत्या. केवळ आरोग्य मंत्री आणि गृहमंत्री त्या बैठकीला त्यावेळी उपस्थित होते. त्याचा खरा फोटो ट्विट करण्यात आला आहे. तर समोर मुख्यमंत्री ऑनलाईन या बैठकीला उपस्थित आहेत असाही एक फोटो फिट करून शितल म्हात्रे यांनी ट्विट केलेला फोटो हा खोटा असल्याचा दावा करण्यात आला आहे. शितल म्हात्रे यांनी खोटा फोटो ट्विट केल्याबाबत मुंबई सायबर क्राईममध्ये शितल मात्रे यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली आहे.
![सुप्रिया सुळे यांचा फोटो खोटा असल्याचा दावा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ncp-on-twit-7209727_24092022101029_2409f_1663994429_971.jpg)
काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून काम करत असल्याचा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांच्याकडून ट्विट करण्यात आला होता. तसेच खासदार श्रीकांत शिंदे हे सुपर सीएम झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत खोचक चिमटा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादीकडून काढण्यात आला होता. त्यालाच उत्तर म्हणून शितल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून असल्याचा फोटो ट्विट केला होता. मात्र तो फोटोच खोटा असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत आता रीतसर तक्रार करण्यात आली आहे.