मुंबई - पेगासस स्पायवेअरचा वापर करून देशातील विरोधी पक्षातील नेते मंडळी आणि पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिले. यानंतर या वृत्ताचे पडसाद संपूर्ण देशभर उमटू लागले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा घेऊन विरोधकांनी गदारोळ केला. तर राज्यातील नेत्यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. राज्यातील सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी तसेच काँग्रेस व विरोधीपक्ष भाजपाच्या नेत्यांनीही एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा - भारतीयांची हेरगिरी केल्याप्रकरणी व्हॉट्सअॅपने व्यक्त केली दिलगिरी
नाना पटोले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना याच्या माध्यमातून राज्यातील नेत्यांचेही फोन टॅप केले जाण्याचा संशय व्यक्त केला आहे. दरम्यान, यापूर्वीही नाना पटोलेंनी त्यांचे फोन टॅप होत असल्याची तक्रार थेट विधीमंडळातही केली होती. याप्रकरणी राहुल गांधींशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी मंगळवारी सांगितले होते.
बाळासाहेब थोरात
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. हे प्रकरण २०१७-१८ मधील असल्याचे ते म्हणाले. देशातील महत्त्वाच्या व्यक्तींची माहिती शत्रू देशांकडे जाऊ शकते, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.
सचिन सावंत
महाराष्ट्रात या आधीच फडणवीस सरकारच्या काळातील रश्मी शुक्ला यांच्या माध्यमातून अनधिकृत फोन टॅपिंगचे प्रकरण समोर आले होते. परंतु पेगॅसस सॉफ्टवेअरच्या वापराच्या बातम्याही येत आहेत. त्यामुळे पेगॅससचा वापर महाराष्ट्रातही झाला का, याची चौकशी महाविकास आघाडी सरकारने करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच डीजीआयपीआरचे अधिकारी कोणाच्या परवानगीने इस्त्रायलला गेले, त्यांनी तेथे कोणते प्रशिक्षण घेतले, परत येऊन अहवाल दिला का, या दौऱ्याचा पेगॅससशी संबंध आहे का, असे प्रश्नही सचिन सावंत यांनी उपस्थित केले आहे. निवडणूक काळात प्रचाराचे काम सोडून असे दौरे होणे आश्चर्यकारक व संशयास्पद आहे. यासंबंधी चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच कोणते अधिकारी कितीवेळा इस्त्रायल गेले, एनएसओसोबत शासकीय बैठका झाल्या होत्या का, एनएसओशी कोणता पत्रव्यवहार झाला होता का, ही सर्व माहिती समोर आली पाहिजे, असेही सचिन सावंत म्हणाले.
हेही वाचा -Pegasus Spyware : काय आहे पेगासस स्पाइवेयर अन् कसे करते हेरगिरी, भारताच्या राजकारणात वादळ
संजय राऊत
शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पेगासस प्रकरणावर प्रतिक्रिया देताना केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. संजय राऊत म्हणाले, की पेगासस हेरगिरी प्रकरणात नाव असलेल्या दोन नेत्यांना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. प्रल्हाद जोशी आणि अश्विनी वैष्णव या दोन केंद्रीय मंत्र्यांची नावेही हेरगिरी प्रकरणात सर्रासपणे पुढे आली आहेत. नंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले. हेरगिरी केल्या गेलेल्या वैष्णव यांना त्याच खात्याचे म्हणजे आयटी खात्याचे मंत्री केले गेले आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचाही फोन कुणी टॅप करत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.
देवेंद्र फडणवीस
पेगॅससच्यामुद्द्यावरून केवळ भारत सरकारला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे. संसदेचे अधिवेशन चालू न देण्याचा काम विरोधक करतात. विरोधकांना चर्चेत कोणताही रस नसून, केवळ विरोधकांकडून गदारोळ घातला जात आहे, असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच फोन टॅपिंगचे आरोप मनमोहन सिंग सरकारवरही झाल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली. देशात असलेला टेलिग्राफ कायदा हा अतिशय कडक असून केंद्र सरकारकडून या कायद्याअंतर्गत अधिकृत फोन टॅप केले जातात.