मुंबई - कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या २५० व त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांवर निर्बंध घातले होते. राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शुक्रवारी निर्बंध उठवल्याने गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे.
२५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या ७० हजार संस्था -
राज्यात २५० पेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या ७० ते ७५ हजार गृहनिर्माण संस्था आहेत. या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्याचे अधिकार सहकार निवडणूक प्राधिकरणाऐवजी संबंधित सोसायटीलाच देण्याचा निर्णय सरकारने तीन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, त्यासाठीची नियमावली तयार नसल्याने निवडणुका कशा घ्यायच्या, असा प्रश्न सहकारी संस्थांसमोर निर्माण झाला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये सहकार विभागाने निवडणुकीबाबतची नियमावली तयार करून त्यावर जनतेच्या हरकती- सूचना मागवल्या. त्यावर गृहनिर्माण संस्थांनी मोठ्या प्रमाणात सूचना नोंदवल्या. त्यानुसार मूळ नियमावलीत अनेक सुधारणा करून अंतिम नियमावली फेब्रुवारी-मार्च दरम्यान मंजूर करण्यात आली.
पात्र गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका त्वरित -
कोरोनाचे संकट आल्याने या निवडणुका तीन वेळा लांबणीवर टाकण्यात आल्या. आता कोरोनाची लाट ओसरत असल्याने राज्याच्या सहकार विभागाने काही दिवसांपूर्वीच २५० पेक्षा अधिक सभासद असलेल्या सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू करण्याचे आदेश दिले होते. आता २५० पेक्षा कमी सभासद असलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून त्याबाबतचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने निर्गमित केला आहे. त्यानुसार या निवडणुकीस पात्र असलेल्या सर्व गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका त्वरित सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत.
हेही वाचा - भविष्यात शिवसेना आणि भाजप एकत्र यावे ही सर्वांची इच्छा; गरज पडल्यास मध्यस्थी करणार- रामदास आठवले