मुंबई - पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानच्या राणीला अर्थात मिनी ट्रेनला कोरोनानंतर प्रवाशांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात माथेरानच्या राणीतून तीन लाखाहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. यातून मध्य रेल्वेला 1 कोटी 82 लाख रुपयांचा महसूल मिळालेला आहे.
1 कोटी 82 लाख रुपयांचा महसूल - माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यानच्या प्रवाशांसाठी शटल सेवेसह मध्य रेल्वेने हे ठिकाण एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. मध्य रेल्वेने 2021- 22 या आर्थिक वर्षात 3 लाख 6 हजार 763 प्रवाशांची वाहतूक केली आहे. अमन लॉज आणि माथेरान दरम्यान आठवड्याच्या दिवशी एकूण 16 सेवा आणि विकेंडला 20 सेवांसह 42 हजार 613 पॅकेजेसची वाहतूक केली आहे. पर्यटकांना आरामदायी प्रवास देण्यासोबतच या सेवा स्वस्त आणि जलद मार्गाने साहित्याची वाहतूक करतात. मध्य रेल्वेने एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीत 1 कोटी 82 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. यामध्ये प्रवासी वाहतुकीतून 1.78 कोटी आणि पार्सल वाहतुकीतून 3.29 लाख रुपयांचा समावेश आहेत.
हिवाळ्यात सर्वाधिक पसंती - माथेरानला जाणाऱ्या प्रवाशांसाठी हिवाळी सुट्टी हा काळ योग्य असतो. नोव्हेंबर 2021 या महिन्यात 42 हजार 21 प्रवाशांनी माथेरानच्या राणीतून प्रवास केला. ज्यातून 27 लाख 65 हजार रुपयांचे महसूल मिळाले आहे. तर डिसेंबर महिन्यात 43 हजार 500 प्रवाशांनी प्रवास केला असून त्यातून 27 लाख 11 हजार महसूल मिळालेला आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात सर्वाधिक महसूल नोव्हेंबर आणि महिन्यातच मिळालेला आहे.