मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी चांदीवाल आयोगाविरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आल्यानंतर याची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती के यू चांदीवाल यांच्या नेतृत्त्वाखालील आयोगाकडून सुरु आहे. या आयोगासमोर उलटतपासणीसाठी उपस्थित राहण्याच्या कायदेशील वैधतेला परमबीर सिंह यांनी विरोध केला आहे. या आयोगाविरोधात त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
दरम्यान, 5 जुलैला परमबीर सिंह यांनी चौकशीला गैरहजर राहण्यासाठी अर्ज केला होता. 30 जुलैला आयोगाने अर्ज फेटाळून लावला होता. 6 ऑगस्टला आयोगासमोर तपासणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. या आदेशाला परमबीर सिंह यांनी कोर्टात आव्हान दिले आहे. मी जे पत्र लिहलं आहे त्या पत्राचा आधार घेत हायकोर्टाने सीबीआयला चौकशी करण्याचे आदेश दिले होते. असे असताना दुसऱ्या संस्थेकडून चौकशी कशासाठी? असा प्रश्न विचारत परमबीर सिंह यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
काय आहे प्रकरण?
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रतिमहिना 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप करणारे पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना लिहिले होते. देशमुख किंवा त्यांच्या कार्यालयातील कोणत्याही अधिकाऱ्याकडून कोणतेही गैरवर्तन किंवा गुन्हा झाल्याबाबत चांदीवाल ही समिती चौकशी करणार आहे.
हेही वाचा - न्यायमूर्ती चांदीवाल आयोगाने परमबीर सिंगला ठोठावला पाच हजाराचा दंड