मुंबई - रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना विविध केसपेपर, ( BMC Paperless Work ) रिपोर्ट सांभाळून ठेवावे लागतात. कधी कधी ते गहाळही होतात. यामुळे रुग्णांची माहिती एका क्लिकवर प्राप्त व्हावी, यासाठी पालिकेने पेपरलेस कामाची घोषणा केली होती. मात्र, गेल्या तीन वर्षात ही घोषणा प्रत्यक्षात उतरली नसल्याचे समोर आले आहे.
पेपरलेस योजना - मुंबई महापालिका तब्बल 107 कोटी रुपये पेपरलेस कामासाठी खर्च करणार आहे. महापालिकेच्या केईएम नायर सायन यासह 16 सर्वसाधारण रुग्णालय पाच विशेष रुग्णालय नायर दंत रुग्णालय 28 मेटरनिटी हॉम्स 161 दवाखाने व 188 हेल्थ पोस्टवर रोज लाखो रुग्णांवर उपचार केले जातात. रुग्णालयांवर येणारा ताण कमी करण्यासाठी व रुग्णाची माहिती एकत्रित संकलित करण्यासाठी पालिकेने 2019 मध्ये पेपरलेस काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे रुग्णाला केसपेपर, आधीचे रिपोर्ट सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही. परंतू 2020 मध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याने या योजनेची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही.
लवकरच अंमलबजावणी - मुंबई महापालिकेच्या नायर, कूपर, डॉ. आंबेडकर शताब्दी, राजावाडी या रुग्णालयासह काही दवाखान्यात प्रायोगिक तत्वावर 2019 मध्ये पेपरलेस कारभार करण्याची योजना राबवण्यात आली. 2020 मध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याने गेल्या 2 वर्षात त्याची अंमलबजावणी करणे शक्य झाले नाही. आता कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने लवकरच याची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
काय आहे योजना - मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक रुग्णाला एक युनिक हेल्थ कार्ड दिले जाणार आहे. याची नोंद संगणकावर असेल. रुग्णाची माहिती, त्याला असलेले आजार, कोणते उपचार केले, कोणत्या चाचण्या केल्या, त्याचा अहवाल काय आला आदी सर्व माहिती संगणकावर केली जाणार आहे. यामुळे एखादा रुग्ण कोणत्याही दवाखाण्यात गेला तरी त्याच्याकडे असलेल्या युनिक हेल्थ कार्डमुळे त्याला उपचार घेणे सोपे होणार आहे. त्याला केसपेपर आणि इतर रिपोर्ट सोबत बाळगण्याची गरज भासणार नाही.