मुंबई राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्याने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर केंद्रीय नेतृत्वाने मुंडे Vinod Tawade यांच्या खांद्यावर मध्यप्रदेश सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच राज्यातील सक्रीय राजकारणापासून दूर असलेल्या विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर Former Union Minister Prakash Javadekar यांची केंद्रीय कार्यकारणीत वर्णी लावली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांचा ही केंद्रीय कार्यकारणीत समावेश केला आहे.
कायम इलेक्शन मोडमध्ये असणारा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भारतीय जनता पार्टीने २०२४ साली होऊ घातलेली आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. त्यासाठी भाजपकडून १५ राज्यांमध्ये प्रभारी आणि सहप्रभारींची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यात विनोद तावडे यांना बिहारच्या प्रभारी पदी, पंकजा मुंडे यांना मध्यप्रदेशात सहप्रभारीपदाची, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळच्या प्रभारी पदाची आणि तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर राजस्थानच्या सह प्रभारी पदाची धुरा सोपवली आहे.
पंकजा मुंडे राष्ट्रीय राजकारणात 2020 साली भाजपाने पंकजा मुंडे यांच्याकडे राष्ट्रीय सचिव अशी जबाबदारी दिली होती. त्यानंतर त्यांना मध्य प्रदेशाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना पुन्हा मध्य प्रदेशात सहप्रभारी अशी जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यात सत्ताबदल होण्यापूर्वी झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या जागांसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावी, अशी त्यांच्या समर्थकांची मागणी होती. मात्र पंकजा मुंडे यांना राज्यापासून दूर ठेवत केंद्रीय राजकारणात ठेवण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न दिसून येत आहे. मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी दक्षिणेतील मुरलीधर राव यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर सहप्रभारीपदी पंकजा मुंडे यांच्यासोबत डॉ. राम शंकर कठेरीया यांची नियुक्ती केली आहे.
विनोद तावडे यांच्याकडे मोठी जबाबदारी विनोद तावडे यांना पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आल्याचे मानण्यात येते आहे. बिहारमध्ये नुकतेच नितीश कुमार यांनी भाजपापासून फारकत घेत राजदसोबत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकांत बिहारमध्ये चांगली कामगिरी करण्याचे आव्हान भाजपासमोर असणार आहे. अशा स्थितीत विनोद तावडे यांना हरियाणानंतर आता बिहारची जबाबदारी देण्यात आलेली आहे. गेल्या वर्षी त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदही देण्यात आलेले आहे.
जावडेकर, रहाटकर यांचा कस लागणार डाव्यांचा गड मानल्या जाणाऱ्या केरळच्या प्रभारीपदाची जबाबदारी ही माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपवली आहे. केंद्रीय मंत्रिपदावरून बाजूला सारल्यापासून प्रकाश जावडेकर हे फारसे सक्रिय नव्हते. मात्र, आता भाजपने त्यांना आणखी एक संधी देऊ केली आहे. तर राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर यांच्यावर भाजपने राजस्थानच्या सह प्रभारी पदाची धुरा दिली आहे. सध्याच्या घडीला भाजपच्या ताब्यात नसणाऱ्या मोजक्या राज्यांपैकी एक म्हणून राजस्थानाची ओळख आहे. याठिकाणी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 'ऑपरेशन लोटस'च्या प्रयत्नानंतरही मोठ्या कौशल्याने काँग्रेसची सत्ता राखली आहे. त्यामुळे विजया रहाटकर याठिकाणी काही चमत्कार करून दाखवतात का, हे पाहावे लागणार आहे.