पालघर : जिल्ह्यात आठ तालुक्यांमध्ये रविवारी 337 ग्रामपंचायतींच्या निवडणूकींसाठी (337 Panchayats election in Palghar district )अवघे दोन दिवस शिल्लक राहिले. या काळात कुठल्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी यासाठी पालघर पोलीस दल सज्ज ( Palghar police alert ) झाले आहे. या निवडणूकींसाठी अधिकारी, पोलीस अंमलदार व होमगार्ड असे मिळून 2646 पोलिसांचा फौजफाटा तयार ठेवण्यात आला आहे, त्यांच्याबरोबर दोन एसआरपी प्लाटून सुद्धा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत.
रविवार, 16 ऑक्टोबर रोजी मतदान - जिल्ह्यातील 337 ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्य पदाच्या जागांसाठी रविवार 16 ऑक्टोबर रोजी मतदान (Panchayats election in Palghar district ) होणार आहे. या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीसांनी जिल्ह्याबाहेरून पोलीस कर्मचारी मागवले असून जिल्ह्यातील स्थानिक पोलीस ठाणे व पोलीस अधिकारी तैनात केले जाणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी संबंधित पोलीस ठाण्यांना दिलेले आहेत. त्यानुसार गावागावांमध्ये सूचना देण्यात येणार आहेत तर काही ठिकाणी पोलीसांनी उमेदवारांना प्राचारण करून त्यांना सक्त ताकीद सुद्धा दिली आहे.
जिल्ह्यात 337 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक - जिल्ह्यामध्ये निवडणूक आयोगाकडून 342 ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये पाच ग्रामपंचायती या बिनविरोध निवडून आल्या असून डहाणू तालुक्यातील एका ग्रामपंचायती मध्ये कोणत्याही प्रकारचे उमेदवारांचे अर्ज न आल्यामुळे त्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नसल्याने एकूण 337 ग्रामपंचायतीच्या निवडणुका रविवारी पार पडणार आहेत. डहाणू तालुक्यांमध्ये 61 ग्रामपंचायती, विक्रमगड तालुक्यात 36, ग्रामपंचायती जव्हार तालुक्यात 46, ग्रामपंचायती वसई तालुक्यात 11 , ग्रामपंचायत मोखाडा तालुक्यातील 22 ग्रामपंचायत पालघर तालुक्यात 71 ग्रामपंचायती, तलासरी तालुक्यात 11 ग्रामपंचायती व वाडा तालुक्यात 68 ग्रामपंचायती मध्ये रविवारी निवडणूक पार पडणार आहेत. यामध्ये पालघर तालुक्यातील दोन ग्रामपंचायती वाडा तालुक्यातील 2 ग्रामपंचायती व जव्हार तालुक्यातील एक ग्रामपंचायतीच्या निवडणुका या बिनविरोध झाल्या आहेत.
पोलीस प्रशासन सज्ज - ग्रामपंचायतीच्या या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडू नयेत याकरिता पोलिस अधीक्षक पालघर यांनी 337 मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला आहे. निवडणूक सोयस्करित्या पार पडावी याकरिता चार पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस निरीक्षक , 107 सहाय्यक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक , 1 हजार 982 अंमलदार, 450 होमगार्ड,आणि दोन राज्य राखीव दलाच्या तुकड्या तैनात ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण निवडणूक शांततेने पार पाडावी, यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील राहणार आहे. दरम्यान, सर्व हद्दीमध्ये पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गावाच्या संवेदनशीलतेनुसार व तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार बंदोबस्ताची विभागणी करण्यात आली आहे. खुल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितले आहे.