मुंबई - कोविड लसीकरण मोहिमेत मुंबईतील १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटाच्या नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य पालिकेने गाठले आहे. त्यानंतर आता १८ ते ५९ वर्षे वयोगटातील ज्या नागरिकांना कोविडचा बूस्टर डोस ( Booster Dose ) घ्यायचा असेल, त्यांना खासगी लसीकरण केंद्रांवर रविवारी (दि. १० एप्रिल, २०२२) पासून सशुल्क लस उपलब्ध होणार ( Paid Booster Dose Vaccination ) आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
१०० टक्के लसीकरण पूर्ण - मुंबईत १६ जानेवारी, २०२१ पासून कोविड लसीकरण मोहीम सुरू झाली. मुंबईत १८ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील ९२ लाख ३६ हजार ५०० पात्र नागरिकांना दोन्ही मात्रा देवून लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. त्यानुसार, पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीची पहिली मात्रा देण्याचे उद्दिष्ट १३ नोव्हेंबर, २०२१ रोजी पूर्ण झाले. तर दोन्ही मात्रा देण्याची उद्दिष्टपूर्ती ५ एप्रिल, २०२२ रोजी झाली.
बूस्टर डोस - ज्या नागरिकांचा जन्म सन १९६३ ते २००४ दरम्यान झाला आहे, असे १८ ते ५९ वयामधील नागरिक कोविड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. लसीची दुसरी मात्रा घेतल्यानंतर ९ महिने ( २७३ दिवस ) पूर्ण झाले असल्यास त्या पात्र नागरिकांना बूस्टर डोस ( Booster Dose ) घेता येईल. पहिल्या आणि दुसऱ्या डोसवेळी जी लस घेतली असेल तीच लस बूस्टर डोस म्हणूनही दिली जाईल. त्यासाठी हे नागरिक थेट खासगी लसीकरण केंद्रांवर जाऊन किंवा कोव्हिन पोर्टलवर ( Covin Portal ) नोंदणी करून लस घेवू शकतात. लस घेण्यासाठी येताना पहिली आणि दोन्ही मात्रा घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगणे आवश्यक असेल. खासगी केंद्रांवर हा डोस सशुल्क मिळणार आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी आणि ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटाचे नागरिकांना पूर्वीप्रमाणेच शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर बूस्टर डोस विनामूल्य मिळू शकेल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.
लहान मुलांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद - दरम्यान, कोविड लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, दिनांक ३ जानेवारी, २०२२ पासून १५ ते १७ वयोगटातील आणि दिनांक १६ मार्च, २०२२ पासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. १५ ते १७ वयोगटातील फक्त ५५ टक्के मुलांनी पहिली मात्रा तर फक्त ४१ टक्के मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील फक्त १३ टक्के मुलांनी पहिली मात्रा घेतली आहे. येत्या जून-जुलै महिन्यात देशात कोविड संसर्गाची चौथी लाट येऊ शकते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञ मंडळींनी दिला आहे. जगातील अनेक देशात कोविडचा फैलाव अद्यापही सुरू आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, सर्व पालकांनी आपल्या पात्र पाल्यांचे कोविड लसीकरण त्वरेने पूर्ण करून घेणे गरजेचे आहे. १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांना कोर्बेव्हॅक्स तर १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सीन लस दिली जाते. ह्या लसी शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर विनामूल्य तर खासगी केंद्रांवर सशुल्क उपलब्ध आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे लसीकरण त्वरेने पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका ( BMC ) प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा - Mumbai Corona Update: मुंबईत ५५ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद