मुंबई - कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊनमुळे जगभरातील व्यवहार ठप्प झाले होते. वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणारे हातमाग व्यावसायिक आणि मत्स्योद्योग घटकांसाठी दिलासा देणारे पॅकेज लवकरच जाहीर करणार असल्याची माहिती वस्त्रोद्योगमंत्री अस्लम शेख यांनी आज 'ई-टीव्ही भारत'शी बोलताना दिली.
हेही वाचा - लोकसभेत आम्ही पंतप्रधानांची वाढलेली दाढी बघायला यावे का? इम्तियाज जलील यांची टीका
मंत्री अस्लम शेख पुढे म्हणाले, राज्य सरकारचे प्राधान्यक्रम सध्या कोरोना नियंत्रणासाठी आहे. मागील काळात मत्स्य उद्योगातील लोकांच्या समस्या समजावून घेऊन आम्ही त्यांच्यासाठी राज्य मंत्रीमंडळाच्या मान्यतेने विशेष पॅकेज दिले. याच पद्धतीने वस्त्रोद्योगामधील सर्वच घटकांच्या कामगारांच्या समस्या आम्ही समजून घेणार आहोत. मी स्वतः निर्देश देऊन या संदर्भात सचिव आणि आयुक्तांसोबत विशेष बैठक देखील घेणार आहे, असे अस्लम शेख यांनी स्पष्ट केले.
वस्त्रोद्योगाच्या हितासाठी केंद्र आणि राज्य पुरस्कृत अशा अनेक योजना आहेत. या योजनांना गती देण्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे प्रयत्न करेल आणि त्याचा लाभ वस्त्रोद्योगातील शेवटच्या घटकापर्यंत निश्चितपणे पोहोचेल, यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मंत्री शेख यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - गरीब कल्याण योजनेतून पश्चिम बंगाल राज्याला वगळलं...अधीर रंजन चौधरींनी उठवला आवाज
वस्त्रोद्योगात काम करणाऱया घटकात दुर्बल वर्गातील घटक आहेत. लॉकडाऊनमुळे अनेककाळ हा उद्योग बंद पडला होता. वीज बिलाचा प्रश्न देखील या क्षेत्रात पुढे आहे. वस्त्रोद्योग व्यावसायिकांना कच्चा माल खरेदी करणे देखील कठीण झाले होते. उत्पादन केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी काही अडचणी निर्माण झाल्या होत्या. राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे या सर्वांचा आढावा घेतला जाईल आणि सर्वंकष धोरण निश्चित केले जाईल. राज्यात उद्योगाच्या माध्यमातून हातमाग व्यवसाय करणारे विविध घटक विविध शहरांमध्ये एकीकृत झाले आहेत. यामध्ये मराठवाड्यातील पैठणी तयार करणारा कारागीर असो किंवा इचलकरंजी, भिवंडीमधील हातमाग कामगार असो, प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करेल. सविस्तर आढावा घेतल्यानंतर यासंदर्भात प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे सादर करून पँकेज संदर्भात अधिकृत घोषणा करू, अशी ग्वाही मंत्री अस्लम शेख यांनी दिली.