मुंबई - कोरोना महामारीच्या संकटकाळात दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. तब्बल 96 तासानंतर ऑक्सिजन एक्सप्रेस' आज सायंकाळी 7 वाजेच्या दरम्यान नागपुरात दाखल होणार आहे. या सात टँकरपैकी तीन टँकर नागपुरात उतरणार असून उर्वरित टॅंकर नाशिकला उतरणार आहे. अशी माहिती राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
९६ तासानंतर 'ऑक्सिजन एक्सप्रेस' दाखल होणार
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुडवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन अभावी कोरोना रुग्णांचा दुर्देवी मृत्यू होत आहे. राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी, राज्य सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात होते. ऑक्सिजन वाहतुकीसाठी केंद्राकडे मागणी केली होती. त्यानंतर ऑक्सिजन वाहतुकीसाठी रेल्वेकडून ऑक्सिजन एक्सप्रेस चालवण्याचा निर्णय घेतला होता. 19 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी कळंबोली येथून विशाखापट्टणमकडे ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना झाली आहे. तब्बल 96 तासानंतर ऑक्सीजन घेऊन ही एक्सप्रेस महाराष्ट्राच्या नागपूर जिल्हात दाखल होणार आहेत.
100 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन
सोमावरी कळंबोली येथून निघालेली ऑक्सिजन एक्सप्रेस गुरुवारी सकाळी 7 टँकर घेऊन विशाखापट्टणम स्टील प्लांट येथे दाखल झाली होती. रेल्वे प्रशासनाने मेडिकल लिक्विड ऑक्सिजनचे ७ टँकर पुरवण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था केली होती. यामुळे राज्याला १०० मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन पुरवला जाणार आहे. एकूण 7 टँकरमध्ये शंभर टन लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन पाठवण्यात आला आहे. यासाठी विशाखापट्टणम स्टील प्लांटच्या अधिकाऱ्यांनी रोलिंग मिल्स परिसरात विशेष रेल्वे ट्रॅक बांधला होता.
नाशिक आणि नागपुरात उतरना ऑक्सिजन टँकर
परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 'ऑक्सिजन एक्सप्रेस' आज सायंकाळी सुमारे सात वाजताच्या दरम्यान नागपुरात दाखल होणार आहे. या 7 ऑक्सिजन टँकरपैकी 3 टॅंकर नागपुरात उतरवण्यात येणार आहे. त्यानंतर ही ऑक्सिजन एक्स्प्रेस नाशिकला शनिवारी सकाळपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये उर्वरित चार ऑक्सिजन टँकर उतरवण्यात येणार आहे. त्यानंतर ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रिकामी पुन्हा कळंबोलीकडे रवाना होणार आहे.
हेही वाचा - कोरोनाबाबत पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यासोबत बैठक; ऑक्सिजन पुरवठ्याची ठाकरे, केजरीवाल यांची मागणी