मुंबई - शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारावरील अपात्रेचा निर्णय ११ जुलैपर्यंत काल सर्वोच्च न्यायालयाने पुढे ढकलला आहे. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आता एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) सोबतचे समर्थक राज्यपालांना सरकारचा पाठिंबा काढत असल्याचे पत्र देणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अद्यापही शिवसेनेच्या नेत्यांना आपण सत्ता राखू असा विश्वास वाटत आहे. शिवसेना युवा नेते आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे ( Tourism Minister Aditya Thackeray ) हे त्यांच्या जाहीर सभेत, मेळाव्यात वारंवार बंडखोर आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचं वारंवार बोलत आहेत. तर आता शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी बंडखोर आमदारांपैकी २० आमदार हे शिवसेनेच्या संपर्कात असून काही दगाफटका झाला, तर ते शिवसेनेच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास व्यक्त केला आहे. ते मुंबईत बोलत होते.
आमदार संपर्कात असतील तर बोलावून घ्या- केसरकर
एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या बंडखोरीमुळे राज्यात राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापले असतानाच, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा वारंवार शिवसेनेकडून संजय राऊत, आदित्य ठाकरे, अनिल देसाई यांच्याकडून केला जात आहे. शिंदे गटाकडे असलेले संख्याबळ बघता महाविकास आघाडी सरकार हे पूर्णतः अल्पमतात आलेले आहे. राज्यपालांनी विशेष अधिवेशन बोलावून फ्लोर टेस्ट घेण्याची मागणी केल्यास हे महाविकास आघाडी सरकार कधीही पडू शकते. याची खात्री आता त्यांना झालेली आहे. परंतु, सध्यातरी जिथपर्यंत ते आमदार गुवाहाटी वरून मुंबईत परतत नाहीत. तोपर्यंत अशा पद्धतीने चर्चा होतच राहणार, म्हणून यावर भाष्य करताना एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी जर २० आमदार तुमच्या संपर्कात आहेत, तर त्यांना बोलावून का घेत नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्यांना बोलावून घ्या असं सांगितलं आहे.