मुंबई - कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकेवर काढले असून, राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व शासकीय तसेच निमशासकीय विभागातील 50 टक्के कर्मचारी उपस्थितीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता एसटी महामंडळाने सुद्धा चालक, वाहक आणि यांत्रिक विभागातील कर्मचारी वगळून, इतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीतीचे आदेश दिले आहेत.
कोरोनाचा प्रसार प्रशासकीय कार्यालयामध्ये होऊन कमर्मचा-यांना संसर्ग होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने कार्यालयीन कर्मचा-यांची उपस्थिती ५० टक्के ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार राज्य परिवहन महामंडळास वाहतूक व्यवसायासाठी "लोकोपयोगी सेवा" म्हणून घोषित केलेले आहे. त्यामुळे वाहतूक सेवा पुरविणे एसटी महामंडळास बंधनकारक आहे. मात्र एसटी महामंडळाने देखील कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, यानुसार चालक, वाहक व यांत्रिक विभागातील कर्मचारी सोडून इतर कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थितीचे आदेश देण्यात आले आहेत.
दक्षता घेण्याचा सूचना
एसटी महामंडळातील तातडीचे व महत्त्वाचे काम चालू राहण्याच्या दृष्टीने संबंधित खाते, विभाग, घटक प्रमुख यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील चालक, वाहक, कार्यशाळा कर्मचारी, अधिकारी व पर्यवेक्षक पदावरील कर्मचाऱ्यांना वगळून, प्रशासकीय कर्मचाऱ्यांना दररोज कार्यालयात न बोलवता त्यांना आळीपाळीने कार्यालयात बोलवावे व त्यानुसार कामाचे नियोजन करावे. अशा प्रकारे कार्यवाही करताना कार्यालयातील एकूण कर्मचाऱ्यांची उपस्थिती 50 टक्के राहील, याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाचे नियम बंधनकारक
राज्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे, कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. नवी नियम तयार करण्यात येत आहेत. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जे नियम बनवण्यात येतील, ते सर्व नियम राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत.