मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly by election) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत अद्यापही कोणताही निर्णय महापालिकेने घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत तिढा निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून शिवसेना अन्य उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवू (Shiv Sena replace Rituja Latke) शकते. या उमेदवारीसाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक प्रमोद सावंत आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या नावाची चर्चा आहे.
उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची निवडणूक - एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी अंधेरी पूर्व पोटनिवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली आहे. या निवडणुकीच्या निकालावर उद्धव ठाकरे यांच्या मुंबई महानगरपालिकेतील पुढील वाटचाली अवलंबून असणार आहेत. त्यातच या जागेसाठी शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या महापालिकेतील नोकरीच्या राजीनाम्यानंतर ज्या पद्धतीने त्यांची कोंडी करण्यात आलेली आहे, ते पाहता आता उद्धव ठाकरे यांनी या जागेसाठी पर्यायी नावांचा विचार सुरू केला आहे.
त्यामुळे दोन्ही संभाव्य उमेदवारांमध्ये चढाओढ सुरु असून निष्ठावान प्रमोद सावंत (Pramod Sawant) आणि बाहेरुन आलेल्या कमलेश राय (Kamlesh Rai) यांच्यातील संघर्ष आता पहायला मिळणार आहे.
सावंत-राय यांच्यात चुरस - अंधेरी (पूर्व) विधानसभा पोट निवडणुकीत ऋतुजा लटके यांची उमेदवारीचे भवितव्य अधांतरी असल्याने या मतदार संघात शिवसेना उध्दव ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. यासाठी ठाकरे गटाच्या दोन माजी नगरसेवकांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी स्पर्धा लागली आहे. माजी नगरसेवक प्रमोद सावंत आणि माजी नगरसेवक कमलेश राव, हे उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असून सन २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत दोघांचे प्रभाग महिला आरक्षित झाल्याने प्रियंका सावंत आणि सुषमा राय या नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. परंतु २०१९च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे कमलेश राय यांनी शिवसेनेत प्रवेश केला (Shiv Sena Andheri East Assembly by election) होता.
कोण आहेत राय व सावंत ? कमलेश राय हे माजी खासदार संजय निरुपम यांच्यासोबत शिवसेनेतून फुटून काँग्रेसमध्ये गेले होते. परंतु काँग्रेसमध्ये निरुपम यांचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर राय यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. तर माजी नगरसेवक प्रमोद सावंत हे ठाकरे गटाचे अंधेरी विधानसभा संघटक असल्याने त्यांनीही लटके यांना उमेदवारी न मिळाल्यास पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छा प्रकट केल्याचे ऐकायला मिळत आहे. लटके यांचे राजकीय भवितव्य न्यायालयाच्या निकालावर अवलंबून असल्याने न्यायालयातही लटके यांना दिलासा न मिळाल्यास शिवसेनेला पर्यायी उमेदवार देण्याची गरज भासणार आहे. तसे झाल्यास सावंत आणि राय या दोन्ही नगरसेवकांपैकी निष्ठावंत प्रमोद सावंत यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.