मुंबई - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आज बैठक बोलावली आहे. 18 जुलैला होणार्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षातील 21 नेत्यांना पत्र लिहिले आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहिले असून अद्याप शिवसेनेकडून या बैठकीसाठी उपस्थिती लावली जाणार का? याबाबत स्पष्टता आलेली नाही.
हेही वाचा - Mumbai High Court : कांजुर कारशेड भूखंड नेमका कुणाचा आज उच्च न्यायालयात होणार 'फैसला'
आपल्या वैयक्तिक कामामुळे या बैठकीला आपण हजर राहणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच ममता बॅनर्जी यांना कळवले आहे. तर आज मंत्री आदित्य ठाकरे यांचा आयोध्या दौरा असल्याने आदित्य ठाकरे किंवा संजय राऊत हे देखील बैठकीला उपस्थित राहणार नाही. त्यामुळे, शिवसेनेकडून या बैठकीला कोणी प्रतिनिधी धाडला जाणार की नाही? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन, केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन, ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.डी. कुमारस्वामी, भाकप नेते डी. राजा या सर्वांना बैठकीचे आमंत्रण दिले आहे. हे पत्र ममता बॅनर्जी यांनी सीताराम येचुरी यांना पाठवले, नंतर ममता बॅनर्जी यांची ही वैयक्तिक भूमिका असल्याची टिप्पणी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी केली होती.
आपण राष्ट्रपती पदाचे उमेदवार नाही - आज विरोधकांची दिल्लीत होणाऱ्या बैठकीत राष्ट्रपती उमेदवाराबाबत चर्चा होणार आहे. मात्र, राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी आपण शर्यतीत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या बैठकीसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री दिल्लीत पोहचल्या आहेत. शरद पवार देखील दिल्लीत असून 14 जूनच्या रात्री शरद पवार यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन आपण राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले असल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - corona update today : कोरोनाचे देशात नवे ६५९४ रुग्ण, मुंबईत रोज १७०० ते १९०० रुग्णांची नोंद