मुंबई - क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणातील आरोपी आर्यन खान सह पाच प्रकरणाचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार असल्याने आता वादाला नवीन तोंड फुटले आहे. आर्यन खान बरोबर अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा जावई समीर खान याचा तपास सुद्धा आता दिल्ली एनसीबी करणार आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढून घेतल्यानंतर राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. समीर वानखेडे यांच्यावर केवळ बिनबुडाचे आरोप झाले म्हणून तपास काढला असेल तर ते चुकीचे आहे, असे त्यांनी म्हटलं. तसेच समीर वानखेडे यांच्याकडून तपास काढला म्हणजे त्यांची चूक आहे असं नाही, असेही ते म्हणाले.
यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता -
नवाब मलिक यांनी म्हटले की, समीर वानखेडे यांना पाच प्रकरणांच्या तपासावरून हटवण्यात आले आहे. एकूण 26 प्रकरणे असून त्याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे मलिक यांनी म्हटले. ही सुरुवात असून सगळी यंत्रणा स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे आणि ती आम्ही करणार असल्याचे मलिक यांनी म्हटले.
आर्यन खानसह सहा प्रकरणांचा तपास आता दिल्ली एनसीबी करणार आहे. यामध्ये नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या प्रकरणाचाही समावेश आहे. अरमान कोहली, इक्बाल कासकर, काश्मीर ड्रग्ज प्रकरणाचा तपासही वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. दरम्यान मुंबई एनसीबीच्या विभागीय संचालकपदाची जबाबदारी समीर वानखेडे यांच्याकडे कायम राहणार आहे.