मुंबई - एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी प्रा. आनंद तेलतुंबडे यांनी त्यांच्या कुटुंबियांना पाठवलेली सर्वच पत्रे कारागृह अधीक्षकांनी रोखली आहेत, असा आरोप तेलतुंबडे यांच्या कुटुंबियांनी केला होता. केवळ आक्षेपार्ह आणि संशय वाटणारी पत्रे रोखली आहेत, असा खुलासा एनआयएच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला आहे.
तेलतुंबडे यांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि वकिलांना पाठवलेली पत्रे रोखलेली नाहीत. मात्र ज्या पत्रातील मजकूर आक्षेपार्ह आणि संशय निर्माण करणारा आहे ती पत्रे अधीक्षकांनी थांबवली आहेत, असे एनआयएने स्पष्ट केले आहे. तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर एनआयएने प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.
हेही वाचा - ड्रग्स प्रकरणातून महाराष्ट्राची बदनामी केली जाते - गृहमंत्री वळसे पाटील
आरोपी वर्नन गोन्साल्विज आणि तेलतुंबडे यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात कारागृह प्रशासनाविरोधात याचिका केली आहे. आम्हाला पाठवलेली खासगी पत्रे कारागृह अधीक्षक पाठवत नाहीत, असा आरोप यामध्ये केला आहे. सर्व आरोपी सध्या तळोजा कारागृहात आहेत. एनआयएने या आरोपांचे खंडन केले आहे. कुटुंबियांना पत्राद्वारे भेटण्यासाठी आम्ही कधीही मनाई केलेली नाही. त्यामुळे याचिकेत दिशाभूल करणारे आरोप केले असून दंडासह याचिका फेटाळून लावा, अशी मागणी केली आहे.
आरोपांचे एनआयएने केले खंडन -
कारागृहात असलेल्या कैद्यांना कुटुंबियांना पत्र पाठवण्याची मुभा आहे. मात्र, ही पत्रे अधीक्षकांकडून प्रथम तपासली जातात. जर त्यात आक्षेपार्ह वाटले तर कारागृह नियमावलीच्या कलम 17(10) नुसार अधीक्षक ही पत्रे थांबवू शकतात, असा दावा एनआयएने केला आहे. रियाज नावाच्या एका व्यक्तीला तेलतुंबडे नेहमी पत्र लिहितात जी संशयास्पद आहेत, असेही तपास यंत्रणेने म्हटले आहे. यामध्ये वादग्रस्त तपशील असून यापूर्वी हा मजकूर एका मासिकात प्रसिद्ध झाला होता, यामुळे खटल्यात बाधा येत आहे, असा दावा यामध्ये केला आहे.
हेही वाचा - बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्र सरकारशी चर्चा सुरू, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री जरदोश यांच्याशी खास बातचित