मुंबई - बुधवारी रात्रीपासून कर्जत ते लोणावळा घाट भागांत सतत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे, रेल्वे वाहतुकीचे मोठे नुकसान झाले. कसारा घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वे सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने एसटीकडे तातडीने सुमारे शंभर बसेसची मागणी केली होती. दरम्यान, एसटी महामंडळाच्या ठाणे विभागातर्फे क्षणाचाही विलंब न करता १०० बस गाड्यांची पूर्तता करण्यात आली. त्यामुळे रेल्वे गाड्या अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ठाणे विभागातून शंभर एसटी बसेस
बुधवार रात्री 10 पासून घाट माथ्यावरील इगतपुरी, शहर व परिसरासह कसारा घाट व पश्चिम पट्ट्यातील काही गावांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे अपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे. कसरा घाटातील रेल्वे मार्गावरील रेल्वे रूळ पाण्याखाली गेले आहेत. तसेच, रेल्वे रुळांवर दरड कोसळण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळांखालील खडी वाहून गेली, तर सिग्नलचीही मोठे नुकसाने झाले आहे.
22 मेल-एक्स्प्रेस गाड्या 'शॉर्ट टर्मिनेट' करण्यात आल्या
बुधवारी रात्री कसरा घाटातील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून जाणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या मेल-एक्सप्रेस गाड्या अडकून पडल्या होत्या. मात्र, आता 22 मेल-एक्स्प्रेस गाड्या 'शॉर्ट टर्मिनेट' करण्यात आल्या आहेत. दरम्यान, अडकून पडलेल्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, म्हणून रेल्वेने एसटीकडे तातडीने सुमारे शंभर बसेसची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत एसटीच्या ठाणे विभागातून शंभर बसेस सोडण्यात आल्या आहेत.
24 रेल्वे गाड्या रद्द
मुसळधार पावसामुळे कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे कसाऱ्यातून नाशिककडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. विशेष म्हणजे रस्ते महामार्गासोबत रेल्वे मार्गालाही याचा फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेने खबरदारी म्हणून, बुधवारी रात्री 10 वाजून 15 मिनिटांनी खर्डी ते ईगतपुरी स्थानकांदरम्याची रेल्वे वाहतूक बंद केली आहे. यामुळे नाशिककडे जाणाऱ्या आणि मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक मेल-एक्सप्रेस रेल्वे गाड्या अडकल्या होत्या. मात्र, अमरावती एक्सप्रेस सुद्धा इगतपुरी जवळ अडकलेली होती. परंतु, प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेता 22 रेल्वे गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत. तर, आज येणारे आणि जाणाऱ्या अशा 24 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.