मुंबई - टाळेबंदीच्या काळात मुंबई उपनगरात हेरॉईन व गांजासारखे अमली पदार्थ विकण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड झाला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने सापळा रचून चिता कॅम्प परिसरातून आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी 60 लाख 80 हजार रुपये अमली पदार्थ जप्त केले आहेत.
मुंबईतील ट्रॉम्बे चिता कॅम्प परिसरात अली मोहम्मद शफी आलम शेख (60) हा आरोपी 1 जुलैला येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी चिता कॅम्प परिसरातील मेट्रो कारशेड , साईबाबा नगर येथे सापळा रचला. यावेळी आरोपी मोहम्मद शफी हा अमली पदार्थ घेवून आला. त्यावेळी पोलिसांनी मुद्देमालासह त्याला अटक केली.
पोलिसांनी 295 ग्रॅम हेरॉईन व 2 किलो गांजा हस्तगत केला आहे. त्याची बाजारातील किंमत 60 लाख 80 हजार आहे. अटक आरोपीवर या अगोदरही ट्रॉम्बे पोलीस ठाणे, घाटकोपर अमली पदार्थ विरोधी पथकात अमली पदार्थाची विक्री व अमली पदार्थ बाळगण्याचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान आरोपी हा पोलीस कोठडीत आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहेत.