मुंबई - सांताक्रूझ येथे वीज प्रवाह खांबामध्ये उतरून आई आणि मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना सोमवारी रात्री घाटकोपरमध्ये अशाच एका घटनेत श्रीहरी सुर्वे यांना आपला जीव गमवावा लागला आहे.
घाटकोपरच्या रामजी नगर येथील रहिवाशी श्रीहरी सुर्वे यांच्या घराच्या शिडीजवळ विजेच्या दिव्याचा खांब आहे. रविवारी या खांबाचा त्यांचा मुलाला शॉक लागला होता. या बाबत मुलाने व स्थानिकांनी अदानी वीज कंपनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे तक्रार दिली होती. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही व उपाय योजना करण्यात आली नाही.
सोमवारी रात्री जेव्हा श्रीहरी घरात जात होते तेव्हा त्यांचा या विजेच्या खांबाला स्पर्श झाला आणि विजेचा तीव्र झटका लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी दोषींवर कारवाई करावी आणि या कुटुंबाला भरपाई अदानी वीज कंपनीने द्यावी अशी कुटुंब व रहिवाशांनी केली आहे.