मुंबई - मुंबई हे शहर महिलांसाठी सुरक्षित समजले जाते, मात्र काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांवरून मुंबई शहर खरेच सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या साकीनाका प्रकरणाचे पडसाद देशभर उमटले होते. साकीनाका येथे एक महिलेवर लैंगिक अत्याचार (sexual harassment) करून तिची निर्घृण हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असताना घाटकोपर(Ghatkopar)मध्ये फूटपाथवर राहणाऱ्या एक महिलेचीदेखील लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करीत हत्या झाल्याचे समोर आले आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
खबऱ्यांच्या सहाय्याने आरोपीचा शोध
हा आरोपी याआधीदेखील एक महिलेच्या हत्याप्रकरणात अटक होता. सागर निहाल यादव असे या आरोपीचे नाव आहे. घाटकोपर पूर्व येथील एक फुटपाथवर राहणाऱ्या शोभा जाधव या महिलेची दोन तारखेला हत्या झाली होती. मात्र या प्रकरणात पोलिसांना आरोपी मिळून येत नव्हता. अखेर गुन्हे शाखा आणि पंत नगर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या सहाय्याने मानखुर्द येथून या आरोपीचा शोध घेतला आहे.
आरोपी सायको
शोभा आणि सागर हे काही वर्षांपूर्वी एकमेकांना ओळखत होते. जेलमधून बाहेर आल्यावर सागर जेव्हा घाटकोपरला आला तेव्हा त्याने जुन्या रागातून आणि लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने शोभाला पकडले आणि तिने विरोध केल्यावर तिचा गळा आवळून हत्या केली. या आरोपीने या अगोदरदेखील महिलेची हत्या केली आणि ही दुसरी हत्या असून ही व्यक्ती सिरीयल, सायको किलर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.