मुंबई - मुंबई पोलिसांच्या युनिट 4 ने मुंबईतील आरसीएफ पोलीस ठाण्याच्या हद्दिमध्ये एका व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्याकडून 500, 200, 100 आणि 50 च्या 657 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मोहमद फकीयांन आयुब खान (35) असे या आरोपीचे नाव आहे.
दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने घरामध्येच बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरू केला होता. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या घरावर छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी 3 लाख 98 हजार 550 रु. च्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तसेच आरोपीच्या घरातून नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे.
कर्जबाजारी झाल्याने आरोपीने छापल्या बनावट नोटा
आरोपी कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे तो झटपट पैसे मिळवण्याचा मार्ग शोधत होता. यातूनच त्याने युट्युबवर बनावट नोटा कशा बनवायच्या याची माहिती घेतली. त्यानंतर त्याने चेंबूर परिसरात एक खोली भाड्याने घेऊन बनावट नोटा छापण्यास सुरुवात केली होती. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.