मुंबई - दोन दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासूनच सुरू झालेला पाऊस अद्याप देखील थांबलेला नाही. त्यातच हवामान विभागाकडून पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता ( torrential rain ) वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच गांभीर्य लक्षात घेत मुंबई व मुंबई उपनगरासह कोकण किनारपट्टीच्या भागात ( NDRF )च्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईत 5 टीम तैनात - दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक भागात पाणी तुंबत व त्यामुळे परिस्थिती निर्माण होते. मुंबईतील सायन, दादर, हिंदमाता परिसर या भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचत. तर, उपनगराचे अनेक भागात देखील अशीच समस्या पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक वेळा मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. यात मोठ्या प्रमाणात जीवित हानी होते. त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या एकूण पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली - कोकणात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच चिपळूणच्या परिस्थितीकडेही लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात सोमवारी सकाळपासून पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.
मुंबई व्यतिरिक्त या भागात NDRF तैनात - मागील वर्षी पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील महाड तसेच चिपळूण शहराला पुराचा जोरदार फटका बसला होता. चिपळूणातील पूरस्थिती आटोक्याबाहेर गेली होती. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी लष्कराला पाचरण करण्यात आलं होतं. पुराचं पाणी घरात दुकानात शिरल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं होतं. मागील वर्षाची स्थिती लक्षात घेता आधीच दक्षता म्हणून चिपळूण शहरात एन ए डी आर एफची एक टीम तैनात करण्यात आली आहे. तर, एक तुकडी महाड शहरात तैनात करण्यात आली आहे. उर्वरित एक तुकडी रत्नागिरी शहरात तैनात आहे. संभाव्य धोक्याची परिस्थिती निर्माण झाल्यास या टीम आवश्यक त्या ठिकाणी आपली सेवा देतील.
रत्नागिरी जिल्ह्यातील 8 नद्या धोक्याच्या पातळीवर -रत्नागिरी जिल्ह्यात एकूण आठ प्रमुख नद्या सध्या मुसळधार पावसामुळे धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. त्यामुळे हा पाऊस पुढील काही दिवस असाच सुरू राहिल्यास या नद्या धोक्याची पातळी ओलांडून जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होऊ शकते. यामध्ये वाशिष्टी, सोनवी, जगबुडी, शास्त्री, काजळी, कोदवली, मुचकुंद, बावनदी या नद्यांचा समावेश होतो. या नद्यांपैकी जगबुडी व काजळी नदी धोक्याची पातळी ओलांडून वाहत असल्याने या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम - २९ जून पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रविवारी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज सोमवारी दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. याचा फटका मुंबईच्या लोकल ट्रेन आणि रस्ते वाहतुकीला बसला. ट्रेन आणि रस्ते वाहतूक विलंबाने सुरू होती. येत्या २४ तासांत काही मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. रेल्वे, रस्ते वाहतुकीवर परिणाम -मुंबईत ११ जूनला पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली होती. २९ जून पासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. शनिवार २ जुलैपर्यंत पाऊस पडला. रविवारी पावसाने विश्रांती घेतली होती. आज सोमवारी पुन्हा पावसाने हजेरी लावली. दुपार नंतर सुरू झालेल्या पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले पालिकेने त्याठीकणी त्वरित पंप सुरू करून पाण्याचा निचरा केला. दरम्यान पावसामुळे दिसण्यास परिणाम होत असल्याने मध्य रेल्वेची सेवा अर्धा तास उशिराने सुरू होती. तर रस्त्यावर अनेक ठिकाणी वाहतूक मंदावली होती. पाऊस, झाडे, घरे पडल्याची नोंद -मुंबईत सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहर विभागात २१ मिलिमीटर, पूर्व उपनगर येथे १७ मिलिमीटर तर पश्चिम उपनगर येथे २५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरात २, पूर्व उपनगरांत ५ व पश्चिम उपनगरांत ७ अशा १४ ठिकाणी झाडे व त्यांच्या फांद्या पडल्या. यात कोणालाही मार लागलेला नाही. तसेच शहरात ३, पूर्व उपनगरांत १ व पश्चिम उपनगरांत १अशा पाच ठिकाणी घरे व घरांच्या भिंती पडल्या तर पाच ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या या घटनांत कोणीही जखमी झालेले नाही.
हेही वाचा - Ramoji Film City : उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री रामोजी फिल्म सिटीमध्ये; पहा, काय म्हणाले