मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणा तपास करत आहे. या प्रकरणात सचिन वाझे या पोलिस अधिकाऱ्याला अटक केल्यानंतर एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे. 17 फेब्रुवारी रोजी ठाण्यातील व्यावसायिक हिरेन मनसुख हा दुपारच्या दरम्यान मुंबईतील जीपीओ जवळच्या सिग्नल जवळ सचिन वाझे याच्या मर्सिडीज कारमध्ये तब्बल दहा मिनिटांसाठी भेटला असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत.
हिरेन मनसुखला केले पाच वेळा फोन
एनआयए च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 फेब्रुवारी रोजी हिरेन मनसुख त्याची स्कॉर्पिओ गाडी घेऊन मुंबईच्या दिशेने निघाला होता. विक्रोळीच्या ठिकाणी त्याची स्कॉर्पिओ गाडी बंद पडल्यामुळे त्याने ओला कॅब करून मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने निघाला होता. ज्या ओला टॅक्सी चालकाची राष्ट्रीय तपास यंत्रणेने जबानी घेतली आहेत त्याच्या जबानी नुसार या प्रवासादरम्यान हिरेन मनसुखला तब्बल 5 वेळा फोन आले होते. हे फोन कॉल सचिन वाझे यांचेच असल्याचं समोर आले आहे. सचिन वाझे यांनी सुरुवातीला हिरेन मनसुख यास मुंबई पोलीस आयुक्तालय समोरील रुपम शोरूम जवळ येण्यास सांगितले होते. मात्र, काही मिनिटातच भेटण्याचे ठिकाण बदलण्यात आले होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या बाहेर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलवर सचिन वाझे यांची मर्सिडीज कार आल्याचं दिसून येत आहे. ही गाडी जीपीओ जवळ येऊन थांबल्यानंतर त्याठिकाणी हिरेन मनसुख चालत येऊन मर्सिडीज कारमध्ये तब्बल दहा मिनिटांसाठी बसला होता. त्यानंतर तो निघून गेल्याचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून समोर आले आहे.
आतापर्यंत पाच गाड्या जप्त
हिरेन मनसुख याने विक्रोळी पोलिस ठाण्यांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार 17 फेब्रुवारी रोजी त्याची स्कॉर्पियो गाडी बंद पडल्यामुळे विक्रोळी हायवेवर सोडून तो क्रॉफर्ड मार्केटच्या दिशेने गेला होता. त्यानंतर ही कार चोरीस गेल्याची तक्रार हिरेन मनसुख यांनी विक्रोळी पोलिस ठाण्यामध्ये नोंदवली होती. दरम्यान, राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने तपास करत असताना सचिन वाझे यांच्या ताब्यात असलेली मर्सिडीज कार ही जेजे स्कूल ऑफ आर्टच्या बाहेरील पार्किंग लॉट मधून जप्त केलेली आहे. आतापर्यंत 5 वाहने जप्त केली असून यामध्ये स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी, मुंबई पोलिसांच्या पथकाची इनोवा कारसह दोन मर्सिडीज गाडी व एक प्राडो गाडी जप्त केली आहे.
फॉरेन्सिक चाचणी होण्याची शक्यता
एनआयएने मर्सिडीज गाडी ताब्यात घेतली आहे. ही गाडी सचिन वाझे वापरत होते, अशी माहिती आहे. याची फॉरेन्सिक चाचणी होण्याची शक्यता आहे. वाझेंच्या घरुनही एक गाडी ताब्यात घेण्यात आली होती. त्यात आता पुन्हा एक मर्सिडीज गाडी ताब्यात घेण्यात आली आहे. कार मायकल रोडवरील बिएमसी पार्किंगमध्ये स्फोटके भरुन बेसमेंटमध्ये ही गाडी पार्क करण्याचा कट होता, अशी माहिती सुत्रांची दिली आहे.
हेही वाचा - अँटिलिया प्रकरण: पाचवी मर्सिडीज गाडी 'एनआयए'ने केली जप्त
हेही वाचा - मनसुख हिरेन हत्या प्रकरण : मुंबई पोलिसांचा हलगर्जीपणा, की षडयंत्र?